Join us

कार्यकर्त्यांना भेटण्यास मनाई

By admin | Published: December 10, 2015 2:43 AM

परमार आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या चौघा नगरसेवकांना भेटण्याकरिता त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मज्जाव केला आहे, तसेच कार्यकर्त्यांची गर्दी होऊ नये,

ठाणे : परमार आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या चौघा नगरसेवकांना भेटण्याकरिता त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मज्जाव केला आहे, तसेच कार्यकर्त्यांची गर्दी होऊ नये, म्हणून पोलीस ठाण्याच्या आवारातील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पहिल्या दिवशी (रविवारी) राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई हे नेत्यांची भेट घेण्यास आले होते. त्यानंतर वाढत जाणारी गर्दी पाहता, केवळ नगरसेवकांचे वकील आणि नातेवाईकांना पोलिसांसमोरच भेट घेण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे एरवी सतत कार्यकर्ते, पदाधिकारी, तसेच अधिकाऱ्यांच्या गराड्यात असलेले हे नगरसेवक आता अक्षरश: एकटे पडले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे माजी शहर अध्यक्ष नजीब मुल्ला, ठामपाचे माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि मनसेचे सुधाकर चव्हाण यांच्यापैकी जगदाळे आणि सुधाकर चव्हाण यांना वैद्यकीय कारणास्तव घरच्या जेवणाला न्यायालयाने परवानगी दिली आहे, तर उर्वरित दोघांना सरकारी जेवण देण्यात येत आहे. दोघांना घरच्या जेवणाची परवानगी असली, तरी तो घेऊन येणाऱ्यांचीही कसून तपासणी केली जाते. संपूर्ण खात्री झाल्यावरच त्यांचा हा डबा पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत त्यांच्याकडे सुपूर्द केला जातो.> चौघांवरही आत्महत्येस प्रवृत्त करणे, या व्यतिरिक्त भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांची एसीपींमार्फत चौकशी करण्यात येत आहे. त्यांची कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात दिवसभर चौकशी होते. त्यानंतर रात्री त्यांना वेगवेगळया पोलीस ठाण्यात ठेवले जाते. त्यांच्यापैकी विक्रांत चव्हाण यांना वर्तकनगर, जगदाळेंना वागळे इस्टेट, मुल्ला यांना कापूरबावडी, तर सुधाकर चव्हाण यांना ठाणेनगर पोलीस ठाण्यात ठेवण्यात येते.