राज्यात पावसाचा जोर आता ओसरणार; ४ दिवस मराठवाड्यात मध्यम, काही ठिकाणी तुरळक पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 05:36 AM2024-07-29T05:36:19+5:302024-07-29T05:36:37+5:30
कोकण व विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, या काळात तुरळक ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आठवड्याभरापासून झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. सोमवारपासून गुरुवारपर्यंत राज्यात कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. कोकण व विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, या काळात तुरळक ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज आहे.
३१ जुलैपर्यंतच्या चार दिवसांत मराठवाडा, तसेच नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथे मध्यम पावसाची शक्यता आहे. येथे १ ऑगस्टपासून जोरदार पावसाचा अंदाज आहे, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले.
खोडशी धरण भरले...! : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कऱ्हाड तालुक्यातील खोडशी येथे कृष्णा नदीवर असलेले ब्रिटिशकालीन खोडशी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या सांडव्यावरून पाणी कोसळत आहे.
चिंता : पावसाची अस्थिरता वाढली
तापमान वाढून पृथ्वीच्या ७५ टक्क्यांहून अधिक क्षेत्रात पावसाची अस्थिरता वाढली आहे. त्यामुळेच अचानक वादळी पाऊस, भीषण दुष्काळ, असे प्रकार अधिक वाढले आहेत.