बळजबरीने बालविवाह लावणाऱ्या चौघांना अटक
By admin | Published: December 5, 2014 12:01 AM2014-12-05T00:01:07+5:302014-12-05T00:01:07+5:30
‘मुलगी शिकली आणि प्रगती झाली’... असे म्हटले जाते. मात्र, ठाण्यात एका अल्पवयीन मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवून तिच्या मनाविरुद्ध एका मंदिरात तिचा विवाह लावला
ठाणे : ‘मुलगी शिकली आणि प्रगती झाली’... असे म्हटले जाते. मात्र, ठाण्यात एका अल्पवयीन मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवून तिच्या मनाविरुद्ध एका मंदिरात तिचा विवाह लावला जात असल्याचे ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने बुधवारी उघडकीस आणले.
याप्रकरणी नवऱ्या मुलासह चौघांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मुलींनाच त्यांच्या लग्नाबाबत निर्णय घेण्याची परवानगी पालकांनी द्यावी, त्यांच्यावर आपला निर्णय लादू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कळवा-सायबानगर येथे राहणारी सोळावर्षीय मुलगी यंदा दहावीला होती. मात्र, तिच्या मागे तिच्या पालकांनी लग्नाचा घाट घालून
तिला दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरू न देता तिचे बळजबरीने बुधवारी कळव्यातील शिवमंदिरात २८ वर्षीय राजू महंती याच्यासोबत लग्न लावण्याचा घाट घातला होता.
याची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला मिळाली होती. त्यानुसार, या पथकाने दुपारी १ वा.च्या सुमारास नवरदेव राजू व त्याचे वडील सुदर्शन महंती, भटजी गोविंद त्रिपाठी आणि उपेंद्र पांडे यांना अटक केली. त्यांच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्या मुलीची सुटका करून तिची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात केली आहे. मुलीच्या वडिलांना दारूचे व्यसन असून मुलाच्या वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)