परदेशी जोडप्याचा मुंबई पोलिस गुप्तवार्ता विभाग शाखेत राडा; अर्ज नामंजूर केल्याने नायजेरियन नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 02:51 PM2023-08-03T14:51:01+5:302023-08-03T14:51:32+5:30
या राड्याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी नायजेरियन पती-पत्नीला अटक केली आहे.
मुंबई : नायजेरियन जोडप्याने परदेशी भारतीय नागरिक (ओसीआय) कार्डसाठी केलेला अर्ज नामंजूर केला. याचा राग आल्याने या जोडप्याने मुंबई पोलिस गुप्तवार्ता विभाग विशेष शाखा-२ च्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करत मारहाण केली. या घटनेमुळे कार्यालयात गोंधळ निर्माण झाला. या राड्याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी नायजेरियन पती-पत्नीला अटक केली आहे.
डिवाइन मुडिया ओयहोसे (४२), पत्नी रिषिका डिवाइन मुडिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. दोघेही सध्या मिरा रोड परिसरात राहतात. ओसीआय शाखेत नायजेरियन डिवाइन याने ओसीआय कार्डसाठी अर्ज केला होता. अर्ज नामंजूर झाल्यामुळे तो स्वीकारण्यासाठी डिवाइन आणि त्याची पत्नी रिषिका डिवाइन मुडिया दोघेही मंगळवारी ओसीआय कार्यालयात आले. यावेळी ओसीआय विभागात कार्यरत असलेले तक्रारदार महेश बासू राठोड (३४) यांनी त्याबाबत सांगितले असता आरोपी डिवाइन संतापला. यावेळी त्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने पैशांसाठी नामंजूर करत असल्याचा आरोप करत गोंधळ घातला.
तपास सुरू -
डिवाइनने त्यानंतर महेश राठोड यांना मारहाण केली. दोन महिला कर्मचारी त्यांना समजावण्यासाठी पुढे येताच, या दाम्पत्याने त्यांनाही धक्काबुकी केली. घटनेची माहिती मिळताच आझाद मैदान पोलिस तेथे दाखल झाले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. राठोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.