मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कामगार कायद्यांत बदल करून कामगारांचा बळी देण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची टीका मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. कामगार कायद्यातील प्रस्तावित बदलांविरोधात विविध क्षेत्रांतील वांद्रे येथील कामगार आयुक्तालयावर काढलेल्या धडक मोर्चाला संबोधित करताना अहिर बोलत होते.ते म्हणाले की, कामगार कायद्यातील प्रस्तावित बदलामुळे आज ३०० कामगारांपर्यंत संख्या असलेल्या ८६ टक्के उद्योगातील ११ लाख कामगारांचा रोजगार धोक्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यापासून कामगार कायद्यांत बदल करण्यास सुरूवात झाली आहे. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या नावाखाली कामगारांचा बळी दिला जात आहे. मात्र कामगार कायदे पायदळी तुडवणाºया सरकारला कामगार रस्त्यावर उतरून चोख उत्तर देतील, असा इशारा अहिर यांनी दिला.हरियाणा, राजस्थान या राज्य सरकारांनी कामगारविरोधी धोरण स्वीकारले असून महाराष्ट्र सरकारही त्याच मार्गावर दिसत असल्याचा आरोप राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी केला. मोहिते म्हणाले की, कामगारांसाठी असलेल्या कायद्यांत बदल करताना कामगार संघटनांना विश्वासात घेतले जात नाही. यावरून सरकार आणि भांडवलदारांमधील साटेलोटे दिसून येते. त्यामुळे यापुढेही चर्चेविना कामगारांच्या कोणत्याही कायद्यात बदल केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा मोहिते यांनी दिला.या मोर्चावेळी कामगार आयुक्त यांना शिष्यमंडळाने भेट देत मुख्यमंत्र्यांपर्यंत कामगारांच्या मागण्या पोहोचवण्याचे आवाहन केले. आंदोलनावेळी कामगार नेते विश्वास उटगी, महाराष्ट्र इंटकचे नेते अनिल गणाचार्य यांचीही भाषणे झाली. सर्व संघटनांच्या नेत्यांनी या वेळी सरकारचा निषेध व्यक्त करत आपला रोष व्यक्त केला.
परदेशी गुंतवणूकदारांसाठी कामगारांचा बळी नको, आयुक्तालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 2:01 AM