पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना परदेशी भाषेचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 02:54 AM2019-07-31T02:54:57+5:302019-07-31T02:55:15+5:30
महापालिका शिक्षण विभागामार्फत सात माध्यमांमध्ये शिक्षण दिले जात आहे.
मुंबई : पालिका शाळांमध्ये शिक्षण घेतलेला विद्यार्थी भविष्यात परदेशात गेल्यास त्याची गैरसोय होऊ शकते. अशा वेळी त्याला तेथील भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे पालिका शाळांतील विद्यार्थी लवकरच अरेबिक, रशियन, फ्रेंच, स्पॅनिश या भाषेचे धडे गिरवणार आहेत. या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी मिळाली. आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविल्यास यावर अंमल होणार आहे.
महापालिका शिक्षण विभागामार्फत सात माध्यमांमध्ये शिक्षण दिले जात आहे. सेमी इंग्रजी, डिजिटल, व्हर्च्युअल वर्ग असे उपक्रम राबवित शाळांचा दर्जा उंचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षण व रोजगाराच्या दृष्टीने इंग्रजी भाषेचे ज्ञान गरजेचे झाले आहे. शिक्षण घेतल्यानंतर विदेशात नोकरीसाठी गेल्यास तेथील भाषा पालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा विषय ठरतो. त्यामुळे अरेबिक, रशियन, फ्रेंच, स्पॅनिश या भाषांपैकी एक भाषा पर्यायी विषय म्हणून पालिका शाळांमध्ये उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी प्रशासनाकडे केली आहे. ही मागणी गटनेत्यांच्या बैठकीत मंगळवारी मान्य करण्यात आली आहे. आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे अभिप्रायासाठी हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.