मुंबई : वकिली कायदा, १९६१ अन्वये केवळ भारतीय वकील किंवा विधि संस्था यांनाच भारतात वकिली करण्याची मुभा असून, विदेशी विधि संस्थांना भारतात शाखा कार्यालय, प्रकल्प कार्यालय किंवा संपर्क कार्यालय स्थापन करण्याची अनुमती देऊ नये, असे निर्देश रिझर्व्ह बँकेेने सर्व बँकांना दिले आहेत.
परकीय चलनविनिमय कायद्यान्वये भारतात विदेशी वकील वा विधि संस्थांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्याची अनुमती दिली जाऊ नये, अशा आशयाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला दिले होते. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना वरीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. परदेशातील वकील वा विधि संस्था भारतात व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्यास तातडीने आमच्या निदर्शनास आणून द्यावे, असेही रिझर्व्ह बँकेने आपल्या निर्देशात म्हटले आहे. ऑक्टोबर, २०१५ मध्ये रिझर्व्ह बँकेने वकिली कायदा, १९६१ अन्वये फक्त भारतीय वकील किंवा विधि संस्था भारतात व्यवसाय करू शकतात, असे सांगत कोणत्याही विदेशी विधि संस्थेच्या परवान्याचे नूतनीकरण करू नये, असे आदेश दिले होते.