श्रीकांत जाधव
मुंबई : परराज्यातून आणलेल्या एक ना अनेक महागड्या विदेशी दारूचा साठा प्रभादेवीत जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली. या कारवाईत जाफर साबिर शेख व दिग्विजयसिंग समंतसिंग जडेजा यांना अटक करण्यात आली. तसेच १८ लाख ७५ हजार ७६० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रेल्वेद्वारे दिल्लीतून महाराष्ट्रात विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या आयात करून चारचाकी टेम्पोतून मुंबईत आणला जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथक क्र. २ मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्र. २ चे निरीक्षक प्रकाश काळे, जयवंत पाटील, दुय्यम निरीक्षक एल. बी. लांघी, विनोद अहिरे, दिनेश खैरनार, विशाल रणपिसे या पथकाने प्रभादेवी, पावसकर हाऊस येथे सापळा लावून कारवाई केली. १७५ सीलबंद बाटल्या परदेशातून आयातीत करून विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या एकूण १७५ सीलबंद बाटल्या, एक चारचाकी वाहन, थर्माकोल बॉक्स व प्लास्टिकच्या गोण्या इत्यादी साहित्य जप्त करण्यात आला आहे. या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास भरारी पथक करत आहे.