परदेशी शिष्यवृत्ती घेणारे ७० टक्क्यांनी वाढले!; विद्यार्थ्यांचा ओढा युके, अमेरिकेकडे
By सीमा महांगडे | Published: July 12, 2022 10:15 AM2022-07-12T10:15:43+5:302022-07-12T10:16:26+5:30
मागील ५ वर्षातील सर्वाधिक वाढ
सीमा महांगडे
शासनाच्या समजकलयं विभागाकडून विविध प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून करण्यात येणाऱ्या अर्ज संख्येत मागील ५ वर्षात यंदा तब्बल ७० टक्क्यांची वाढ झाली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा हा अमेरिका आणि ब्रिटन सारख्या देशांतील विद्यापीठांकडे अधिक असल्याचे विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. विविध प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाचे पाठबळ मिळून त्यांनी परदेशातील पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात भारताला जागतिक नावलौकिक मिळवून देण्याच्या शासनाच्या प्रयत्नाला यामुळे बळकटी मिळत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
राज्यातून आणि देशातून मोठया संख्येने भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जात असतात. यातील अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने उच्च शिक्षणातील त्यांच्या प्रगतीला अनेकदा अडथळा ही येतो, तो येऊ नये या कारणास्तव शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून दरवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. ही योजना २००३ पासून राबविली जात असून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
तसेच या योजनेंतर्गत राज्यातील अनूसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी क्यूएस वर्ल्ड रँकिंग मध्ये पहिल्या ३०० विद्यापीठाच्या नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे उत्तमोत्तम शिक्षण प्राप्त होत असते.
आतापर्यन्त ७१४ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ
दरवर्षी या विद्यार्थांची परदेशातील शिक्षणाची मागणी लक्षात घेता शिष्यवृत्ती धारकांच्या संख्येत ट्प्याटप्याने वाढ करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ अखेर ७१४ विद्यार्थांचे या शिष्यवृती योजनेमुळे परदेशातील शिक्षणाचे स्वप्न पुर्ण झाले आहे. त्यात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या ७५ विद्यार्थ्यांची वाढ होणार आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये परदेश शिष्यवृत्ती संदर्भात विभागाच्या वतीने व्यापक प्रचार करण्यात आल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत याची माहिती पोहचत असून त्यांच्याकडून चंगळ प्रतिसाद मिळत आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना ही परदेशी शिक्षणाचा लाभ मिळत आहे यातच या उपक्रमाचे यश आहे.
- डॉ प्रशांत नारनवरे,
आयुक्त, समाज कल्याण विभाग
मागील ५ वर्षातील परदेशी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची अर्जसंख्या
वर्ष अर्ज संख्या निवड झालेले विद्यार्थी संख्या
२०१७- १८ १७३ ५०
२०१८-१९ १६० ७५
२०१९-२० १५४ ७५
२०२०-२१ २१३ ७५
२०२१-२२ ३०१ ७५
२०२२-२३ २९५ ७५