परदेशी विद्यार्थ्यांनाही हवा भारताचा वर्षाचा वर्क व्हिसा, मिळतोय कामाचा योग्य आर्थिक मोबदला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 10:18 AM2024-03-12T10:18:13+5:302024-03-12T10:19:54+5:30
भारतात परदेशी विद्यार्थ्यांना वैद्यकीय वगळता सर्व प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो.
मुंबई : भारतीय विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणानंतर सहा महिने किंवा वर्षभराकरिता दिल्या जाणाऱ्या अमेरिकी वर्क व्हिसाच्या धर्तीवर भारतात उच्चशिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही वर्षभर काम करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अभ्यासक्रम आधारित प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची (सीपीटी) सुविधा अमेरिका, इंग्लंडसारख्या काही देशांमध्ये आहे. या कामाचा योग्य आर्थिक मोबदलाही विद्यार्थ्यांना दिला जातो.
भारतात परदेशी विद्यार्थ्यांना वैद्यकीय वगळता सर्व प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. परंतु नेपाळचे विद्यार्थी वगळता इतर परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर भारतात काम करण्याची परवानगी नाही. भारतीय शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण करायचे असेल तर परदेशी विद्यार्थ्यांना भारताचा वर्क व्हिसा लागू व्हायला हवा, अशी शिफारस ‘इंडियन कौन्सिल ऑफ ग्लोबल रिलेशन्स’ने केलेल्या संशोधनात केली आहे. भारतीय कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीयीकरणालाही यामुळे चालना मिळेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.
१) ‘इंटरनॅशनलायझिंग इंडियन एज्युकेशन : वर्क व्हिसा फॉर फॉरेन स्टुडंट नामक’ हा शोधनिबंध मुंबईच्या अभ्यासक सिर्फा लेन्टिन यांनी लिहिला आहे.
२) उच्चशिक्षणासाठी भारतात आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक ते तीन वर्षांपर्यंत भारतात नोकरी करण्याची परवानगी देता येऊ शकते.सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट म्हणून अशी मान्यता द्यावी. त्यानंतर याबाबतचे धोरण निश्चित करण्यात यावे, अशी शिफारस त्यांनी केली आहे.
कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्राला पसंती- भारतात २०२०-२१ साली ८,०९४ विद्यार्थी शिकत होते. त्यापैकी सर्वाधिक विद्यार्थी कर्नाटकात शिकत होते.
अभ्यासक्रमानुसार व्हिसा देण्याची शिफारस - पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा आणि डॉक्टरेट आणि पोस्ट-डॉक्टरेटचा अभ्यास पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचा व्हिसा दिला जावा.
१) नेपाळमधील २८ ते ३० टक्के
२) ७ ते १० टक्के अफगाणिस्तानातील
भारतातील परदेशी विद्यार्थी - पंजाब, महाराष्ट्र (विशेषतः पुणे), दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांना परदेशी विद्यार्थ्यांची पसंती असते.
१) मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात २०२०-२१मध्ये १०१ विद्यार्थी शिकत होते.
२) विडनंतर निर्बंध दूर झाल्यानंतर हा आकडा वाढून २०२१-२२मध्ये ११२वर गेला. २०२२-२३मध्ये १२०वर गेला.
३) मुंबई विद्यापीठाखालोखाल मुंबईत आयआयटी, नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्डडीज, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थांमध्ये परदेशी विद्यार्थी प्रवेश घेतात.
दक्षिण आशियातून विद्यार्थी मोठ्या संख्येने भारतात शिकण्याकरिता येतात. यात नेपाळमधील विद्यार्थी २८ ते ३० टक्के आहेत. केवळ नेपाळच्या विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण पूर्ण केल्यानंतर काम करता येते.
७ ते १० टक्के विद्यार्थी अफगाणिस्तानातील आहेत. सहा ते सात टक्के विद्यार्थी बांगलादेशातून आहेत. अमेरिकेतून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. भारतातील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये अमेरिकेतील पाच ते सहा टक्के विद्यार्थी आहेत.