मुंबई : भारतीय डॉक्टरांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अनेक भारतीय विद्यार्थी, डॉक्टर हे परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतात. देशी विद्यार्थी आणि परदेशी विद्यापीठांचे हे चित्र बदलण्याची वेळ आहे. परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करेल अशी अत्याधुनिक शिक्षण पद्धती आपल्याकडे विकसित व्हायला हवी, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी व्यक्त केले.राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित मंगळवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या सोहळ्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, आॅस्ट्रेलियाचे पर्यटन मंत्री पॉल पॅपेलीया, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कुलगुरू दिलीप म्हैसेकर यांच्यासह देशविदेशातील वैद्यक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.राज्यपाल म्हणाले की, भारतात दर दहा हजार माणसांमागे एक डॉक्टर आहे. ही विषम स्थिती बदलतानाच विद्यार्थ्यांपर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत संशोधन आणि उपचार पद्धतीही पोहचायला हवी. जागतिक संशोधन आणि उपचार पद्धतींना सामावून घेईल अशा पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना करण्याची गरजही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र याकामी महत्त्वाची भूमिका बजावेल. भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील अत्याधुनिक ज्ञानाची आवश्यकता भासते.आपल्याकडील आयुर्वेद आणि योगाभ्यास आज जगभर पोहचले आहे. भारताच्या या प्राचीन ज्ञानातून आज जगभरातील लाखो लोक निरोगी आयुष्य जगत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. माहिती-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील संशोधन, उपचार पद्धतीची देवाणघेवाण व्हायला हवी.
‘परदेशी विद्यार्थी आपल्या विद्यापीठात यायला हवेत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 5:46 AM