Join us

परदेशी पर्यटकांना पाहता येणार चित्रपट-मालिकांचे चित्रीकरण- आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 12:50 AM

पर्यटनस्थळांवर लागणार क्यूआर कोड

मुंबई : कोविड काळानंतर पर्यटन उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने मंगळवारी विविध सामंजस्य करार करण्यात आले. मुंबईत परदेशी पर्यटकांना प्रत्यक्ष चित्रीकरण पाहण्याचे तसेच कलाकारांसोबत संवाद साधण्यासाठी राज्याचे पर्यटन संचालनालय आणि स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राइम लिमिटेडमध्ये करार करण्यात आला. याशिवाय, प्रमुख पर्यटनस्थळांवर ऑफलाइन क्यूआर कोड लावणे, दी मुंबई फेस्टिव्हल तसेच खाद्यसंस्कृतीला चालना देण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आले. 

सह्याद्री अतिथीगृहातील कार्यक्रमात पर्यटनवाढीच्या दृष्टीने विविध सामंजस्य करार करण्यात आले. या वेळी आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यमंत्री अदिती तटकरे, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बाॅलीवूडबद्दल असलेले आकर्षण लक्षात घेत प्रत्यक्ष चित्रीकरण पाहणे पर्यटकांसाठी पर्वणी असेल. यासाठी खास तयार करण्यात आलेल्या बसचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या बसच्या माध्यमातून पर्यटकांना प्रत्यक्ष चित्रपट, टीव्ही मालिका आदींचे चित्रीकरण पाहता येईल. जुन्या चित्रपटांच्या चित्रीकरण स्थळाची सैर घडवून आणतानाच हॉलीवूडमधील लॉस अँजेलीस - बेव्हर्ली हिल्स टूरच्या धर्तीवर वांद्रे (पश्चिम), जुहू, लोखंडवाला, सातबंगला या भागांमधून प्रमुख सेलिब्रिटी कलाकारांचे बंगले, निवासस्थाने दाखविली जाणार आहेत. राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती, रस्त्यांना, चौकांना दिलेल्या नावांचा इतिहास यांचा ऑफलाइन क्यूआर कोड बनवून पर्यटकांना ती माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पोलक्स स्टार एलएलपी यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला.  मुंबईमध्ये २५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे. कृषी पर्यटन धोरण राबवून कृषी पर्यटनाचा विकास करणे हे ध्येय आहे. पर्यटनस्थळांवर क्यूआर कोडचा वापर झाल्याने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू होत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

विविध कृषी पर्यटन केंद्रांचा सन्मान

 कृषी पर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पांडुरंग तावरे यांचे बारामती कृषी व ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण संशोधन विकास केंद्र (पळशीवाडी, ता. बारामती, जि. पुणे), प्रतिभा सानप यांचे सृष्टी ॲग्रो टुरीजम (मिर्जापूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), प्रशांत कामत यांचे वनश्री फार्म्स कृषी पर्यटन केंद्र (माडखोल, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), भावेश दमनीवाला, डीएस फार्म्स कृषी केंद्र (येरळ, ता. रोहा, जि. रायगड), जोसे थॉमस कन्नाई, कृषी पर्यटन केंद्र (कन्नाई धारपी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), भरत महल्ले यांचे मीरा ॲग्री गॅलरी (रेवसा, जिल्हा अमरावती) यांना या वेळी नोंदणी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

टॅग्स :आदित्य ठाकरेमहाराष्ट्र सरकार