मुंबई : मुंबई पोलिसांच्या संरक्षण व सुरक्षा शाखेत तैनात असलेले आणि बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांचे माजी ‘बॉडीगार्ड’ जितेंद्र शिंदे यांचे मंगळवारी पोलीस दलातून निलंबन करण्यात आले. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय परदेश दौरा आणि कोट्यवधी रुपयांच्या वार्षिक मिळकतीची माहिती खातेअंतर्गत चौकशीत उघड झाल्यावर पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
जितेंद्र शिंदे यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मिळकतीच्या बातम्या व्हायरल झाल्यावर त्यांची डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. दरम्यान, त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडून आर्थिक मदत घेत पत्नीच्या नावाने स्वत:ची सुरक्षा कंपनी सुरू केल्याचे समजले. बच्चन यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याने, ते कुठेही गेले तरीही त्यांच्यासोबत दोन पोलीस कॉन्स्टेबल असतात. दरम्यान, शिंदे यांनी वरिष्ठांकडून कोणतीही परवानगी न घेता चार-पाच वेळा दुबई आणि सिंगापूर असा परदेशी प्रवास केला. परदेश प्रवासासाठी वरिष्ठांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र शिंदे यांनी सुटी घेताना खोटे कारण दिले. याबाबत अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खातेनिहाय चौकशी करण्यात आली होती. त्यात परदेश दौरे, मिळकत लपविणे आणि सुरक्षा एजन्सीसंदर्भात आरोप सिद्ध झाले. हा अहवाल सावंत यांनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे सुपूर्द केल्यावर शिंदेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
सेलिब्रेटींचा सुरक्षारक्षकया जितेंद्र शिंदे हे मुंबई पोलिसात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. ते २०१५ पासून बिग बींचे बॉडीगार्ड म्हणून रुजू झाले होते. त्यांनी २०२१ पर्यंत अनेक मोठ्या सेलिब्रिटींना सुरक्षा पुरविली. नंतर त्यांची डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली.