मुंबई : कोरोनाच्या भीतीमुळे राज्याबाहेरील सुमारे पाच लाख ट्रकचालक आपापल्या राज्यात परत गेले आहेत. ते भाड्याने राहत असलेल्या ठिकाणी भांडी आणि इतर वस्तू आहेत, त्यामुळे भाडे सुरू आहे. लॉकडाउनमुळे त्यांचे भाडे थकले असून त्यांच्या मदतीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ट्रकचालकांनी केली आहे.
जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे राजेंद्र वनवे म्हणाले की, लॉकडाउनमुळे अनेक ट्रकचालकांना अन्न मिळाले नाही. ते ट्रकचालक शहर सोडून गावाकडे जात असल्याचे समोर आले आहे. राज्यातील एकूण चालकांपैकी ७५ टक्के चालक हे राज्याबाहेरील आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे आदी मोठ्या शहरात एमआयडीसी क्षेत्रातील मालाची वाहतूक तसेच इतर अंतर्गत वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरील चालक मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा येथून येतात.चालकांनी जाताना केवळ कपडे नेले आहेत, त्यांची भांडी आणि इतर वस्तू तशाच आहेत, त्यामुळे भाडे सुरू आहे. ते परत आले तर भाड्याची रक्कम खूप वाढलेली असेल.
त्यामुळे सरकारने या चालकांना मदत करावी. कोरोना जाईपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये मीठभाकर खाऊ. कोरोनामुळे आम्ही केवळ कपडे घेऊन उत्तर प्रदेशला आलो आहोत.माझे काही मित्र आपल्या कुटुंबासह असेच परत आले आहेत. कोरोनामुळे त्यांच्या घराचे भाडे थकले आहे. ते भाड्याने राहत होते, त्या घरात कपाट, फ्रीज आदी वस्तू तशाच आहेत. मालक आम्हाला भाड्याबाबत विचारणा करत आहेत, पण घरातील वस्तू एका बाजूला ठेवून तुम्हाला घर भाड्याने द्यायचे तर द्या असे सांगितले.कोरोनामुळे अनेक चालक आपल्या गावी परतले, पण गावी जाताना त्यांचे खूप हाल झाले. त्यामुळे ते परत येण्याच्या परिस्थितीत नाहीत.