मुंबई - दोन कोटी रुपयांच्या गोल्ड बारसह चार प्रवाशांना मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. त्यात दोन परदेशी महिलांचा समावेश असून या तिन्ही घटनेत या अधिकार्यांनी सव्वासात किलो वजनाचे गोल्ड बार जप्त केले आहे. या गोल्ड बारची किंमत सुमारे दोन कोटी रुपये असल्याचे कस्टम अधिकार्याने सांगितले. गेल्या काही वर्षात गोल्ड, परदेशी चलन आणि ड्रग्जच्या तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांची हवाई गुप्तचर विभागाने कसून तपासणी सुरु केली आहे. मंगळवारी शारजाह येथून दोन विदेशी महिला आल्या होत्या. या दोघींची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांनी अंर्तवस्त्रातून गोल्ड बार घेऊन आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या दोघींना या अधिकार्यांनी अटक केली.
नादा अहमद मोहम्मद ओमेर आणि मनाल ओमर अलहसन मेहमूद अशी या दोघींची नावे असून त्या सुदान देशाच्या नागरिक आहेत. त्यांच्याकडून 1 किलो 399 ग्रॅम वजनाचे बारा गोल्ड बार या अधिकार्यांनी जप्त केले असून त्याची किंमत 32 लाख रुपये आहे. दुसर्या घटनेत हाफीज अबदुरुब या प्रवाशाला या अधिकार्यांनी अटक केली. ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडत असताना त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी त्याच्याकडे अधिकार्यांनी 1 कोटी 37 लाख रुपयांचे सुमारे पाच किलो वजनाचे गोल्ड बार जप्त केले आहे. त्याच्या चौकशीनंतर शेख इरफान याला अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. तिसर्या घटनेत दुबईहून मुंबईत आलेल्या स्पायजेट एअरवेजच्या एका सीटमधून लपवून आणलेले 26 लाख 17 हजार रुपयांचे 932 ग्रॅम वजनाचे आठ गोल्ड बार अधिकार्यांनी जप्त केले.