मुंबई : शेतमाल आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. कांद्याचे भाव वाढल्याने ओरड होत आहे, पण शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार, याचा विचार कोणीही करत नाही. सरकारचे हे आयात धोरण चुकीचे असून, परदेशी कांदा विकू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
कोल्हापूर जिल्हा समन्वयक दिलीप पाटील, संतोष गव्हाणे पाटील, प्रवीण पाटील, विवेकानंद बाबर, रूपेश मांजरेकर, महेश राणे आदी या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. दिलीप पाटील म्हणाले की, ‘सरकारचा कांदा आयात करण्याचा विचार आहे. १५ दिवसांत कांदा आयात केला जाईल. जानेवारीत परदेशी कांदा राज्यात आल्यास शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कोण देणार? सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा शेतकºयांच्या आर्थिक संकटात वाढ होईल. त्यामुळे परदेशातून आयात केलेला कांदा विकू देणार नाही, असे ते म्हणाले.
हैदराबाद प्रकरणात पीडितेला तत्काळ न्याय मिळाला, परंतु कोपर्डी हत्याकांडाला अडीच ते पावणेतीन वर्षे झाली. न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली, पण अंमलबजावणी बाकी आहे. आमच्या सहनशीलतेचा उद्रेक होण्यापूर्वीच सरकारने कोपर्डीच्या भगिनीला न्याय द्यावा, असे पाटील यांनी सांगितले.