मुंबई : ‘पवईत विदेशी नागरिक २१ व्या मजल्यावरून आत्महत्या करत आहे’ असा फोन गुरुवारी पोलीस नियंत्रण कक्षावरून साकीनाका पोलिसांना आला. मुख्य म्हणजे पत्ता चुकीचा मिळून सुद्धा अवघ्या काही वेळातच त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दीड तास विनवण्या करत त्या व्यक्तीला पोलिसांनी आत्महत्येपासून परावृत्त केले.पवई पोलिसांना गेल्या गुरुवारी पोलीस नियंत्रण कक्षाने विदेशी वृद्ध २१ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. साकीनाका विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले हे पवई पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अनघा सातवसे, बळवंत देशमुख, हेड कॉन्स्टेबल राम हांडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाघ, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ जवळे यांच्यासह निघाले. सुरुवातीला पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या टोराणो इमारत, हिरानंदानी या पवईतील पत्त्यावर ते पोहोचले. मात्र तेथे त्याचे आॅफिस असून राहायला ते दुस-या पत्त्यावर असल्याचे त्यांना समजले. त्यानुसार हिरानंदानी, अवलोन इमारतीच्या ३३ व्या मजल्यावर ते पोहोचले. तेव्हा सॅम कोलार्ड (६१) यांनी दरवाजा बंद केला होता. खेतले यांनी संवाद साधत दरवाजा उघडण्यास लावला. कोलार्ड यांना लकवा मारल्याने त्यांना जगण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला आणि विदेशातील पत्नीला त्याबाबत ब्रिटिश कौन्सिलकडे सांगितले. त्यानुसार ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली.उपचारासाठी केले रुग्णालयात दाखलपोलीस त्यांच्या घरी गेले असता कोलार्ड यांनी दरवाजा उघडला. मात्र ते पोलिसांशी संबंधित नसलेल्या जगभरातल्या गप्पा मारत होते. त्यांच्यावर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांना समजल्यावर पोलिसांनी रुग्णवाहिका मागवली. खेतले आणि त्यांच्या पथकाने अत्यंत सावधगिरी बाळगत कोलार्ड यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत त्यांचा जीव वाचवला. त्यासाठी ब्रिटिश कौन्सिलने पवई पोलीस ठाण्यात भेट देत पोलिसांचे आभार मानले आणि प्रशस्तीपत्र देत सन्मानित केले.
दीड तास विनवण्या अन् अखेर वाचला पवईत राहणाऱ्या विदेशी वृद्धाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 4:19 AM