सीपीयू, हार्डडिस्कमधील डाटा शाेधण्याचा प्रयत्न; एनआयए घेणार तज्ज्ञांची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएला वांद्रेतील मिठी नदीच्या पात्रातून मिळालेल्या महत्त्वपूर्ण पुराव्यांची आता फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी केली जाईल. त्यातील बहुतांश डाटा खराब झाला असला तरी तज्ज्ञांद्वारे त्यातील माहिती जमविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या या वस्तू हा वाझेच्या कटाबाबत सबळ पुरावा मानला जात आहे.
निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेने आपल्याविरुद्धचे पुरावे सापडू नयेत म्हणून गुन्ह्यासाठी वापरलेल्या सर्व वस्तू, दस्तऐवज मिठी नदीच्या पात्रात फेकून दिल्या होत्या. रविवारी अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी शोधमोहीम राबविली. वाझेने सांगितलेल्या परिसरात १२ पाणबुड्यांना शोध घेण्यास सांगितले. त्यामध्ये दोन सीपीयू, दोन हार्डडिस्क, एकाच क्रमांकाच्या दोन नंबर प्लेट आणि आणि अन्य साहित्य सापडले. नदीत टाकण्यापूर्वी वाझेने ते जाड वस्तूने ठोकून खराब केले होते. त्यामुळे त्यातील डाटा परत मिळविणे अडचणीचे ठरेल. त्यासाठी तो तातडीने फोरेन्सिक लॅबकडे पाठविला जाणार असल्याचे समजते.
रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास मिठी नदीच्या वांद्रे येथील पात्राकडे पथकाने वाझेला सोबत घेऊन मोर्चा वळविला होता. एनआयएचे एसपी विक्रम खलोट यांच्या नेतृत्वाखाली सुमारे साडेतीन तास पाण्यात शोध घेण्यात आला.