प्रशासनाकडून ठाेस कारवाई नाही; पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या उपनगरातील एकमेव आरेचे जंगलही आता आगीच्या कचाट्यात सापडू लागले आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात येथे सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत असून आरे प्रशासन याबाबत ठोस कारवाई करत नसल्याची नाराजी पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
पर्यावरण रक्षणासाठी आरेत काम करत असलेल्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात येथे आगी लागण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. विशेषतः गेल्या दोन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणावर आग लागत असून ती विझविण्यासाठी कार्यकर्ते स्वतः काम करत आहेत. आग विझविण्यासाठी मुंबई अग्निशमन दलास पाचारण करण्यात येत असले तरी या कामात अनेक अडथळे येत असल्याने वेगाने आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड हाेत आहे.
येथील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरे प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र सातत्याने याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आरेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आगीत पक्षी, प्राण्यांना झळ बसत असून वनसंपदाही मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहे. वेळीच याच्यावर उपाययोजना केल्यास भविष्यात या आगी टाळता येतील, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
आरे येथील पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेले संजीव वासलन यांनी दिलेल्या माहितीनुसार, विहार लेक रोड, युनिट नंबर १६, आरे डेअरी आणि मेट्रो कार शेडलगतचा परिसर, जांबोरी आणि खडक पाडा, मॉर्डन बेकरी, युनिट नंबर १, तापेश्वर मंदिर, कोंबडा पाडा, फिल्टर पाडा, आरे गेस्ट हाऊस या परिसरासह लगतच्या परिसरात सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत असून आरे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
* दर दाेन दिवसांनी लागते आग
दर दोन दिवसांनी येथे आग लागत आहे. गेल्या दहा दिवसांपासून आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत लागलेल्या आगीचा आकडा सुमारे वीसपेक्षा जास्त असावा. आरेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या परिसरातही आग लागल्याची घटना घडली आहे. अशा वेळेस त्यांनी यावर उपाय करणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्याकडून काहीच कारवाई केली जात नाही, अशी खंत पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
...................................