फ्लेमिंगाेंच्या मृत्यूची वनविभागाकडून चौकशी; अपर मुख्य प्रधान वनसंरक्षकांची माहिती
By सचिन लुंगसे | Published: May 22, 2024 04:41 PM2024-05-22T16:41:25+5:302024-05-22T16:42:06+5:30
२० मे रोजी रात्री ८.४० वाजता घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, लक्ष्मीनगर-पंतनगर भागात विमानाला धडकून फ्लेमिंगाे ३९ पक्षी मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे, त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी पाेहोचून पाहणी सुरू केली.
मुंबई : दुबईहून मुंबईत येत असलेल्या एमिरेट्सच्या विमानाला घाटकोपर येथे फ्लेमिंगोची धडक बसली. याप्रकरणी वनविभागाने तत्काळ चौकशी सुरू केली असल्याचे राज्याचे अपर मुख्य प्रधान वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी सांगितले.
२० मे रोजी रात्री ८.४० वाजता घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, लक्ष्मीनगर-पंतनगर भागात विमानाला धडकून फ्लेमिंगाे ३९ पक्षी मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे, त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी पाेहोचून पाहणी सुरू केली. त्यानंतर विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, मुंबई कांदळवन विभागाचे सहायक वनसंरक्षक विक्रांत खाडे हे कर्मचाऱ्यांना घेऊन अपघातस्थळाची पाहणी करून २९ मृतपक्षी ताब्यात घेतले. २१ मे रोजी सकाळी पुन्हा पाहणी केली असता आणखी १० मृत पक्षी सापडले. या सर्व मृत पक्ष्यांचे ऐरोलीतील वन विभागाच्या सागरी-किनारी जैवविविधता केंद्रात शवविच्छेदन करण्यात येत आहे.
दीपक खाडेंचे पथक करणार तपास
- या संपूर्ण घटनेचा तपास विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कांदळवन विभागाचे सहायक वनसंरक्षक विक्रांत खाडे करीत असल्याचे रामाराव यांनी स्पष्ट केले आहे.
- नॅट कनेक्टच्या तक्रारीवर मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली मॅन्ग्रोव्ह समिती २९ मे रोजी या तलावाची तपासणी करणार आहे, तर केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयानेही राज्य पर्यावरण विभागाला चौकशी करून अहवाल देण्यास सांगितल्याचे नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.
- सागर शक्तीचे नंदकुमार पवार यांनी उरण तालुक्यातील बेलपाडा, भेंडखळ आणि पाणजे पाणथळीच्या जागा सिडकोने पायाभूत सुविधांसाठी भाड्याने दिल्याने ती नष्ट होत असल्याचे सांगितले. पाणथळींच्या ठिकाणी फ्लेमिंगो येतात, असे पक्षीप्रेमी ज्योती नाडकर्णी म्हणाल्या. या पक्ष्यांचा त्यांच्या अधिवासावर हक्क आहे, ज्यापैकी मुंबईची खाडी एक महत्त्वाचा भाग आहे, असे खारघरचे कार्यकर्ते नरेशचंद्र सिंग यांनी सांगितले.
उरण, नवी मुंबईच्या पाणथळींचा प्रश्न ऐरणीवर
- उरण, पनवेल, नवी मुंबई परिसरातील पाणथळी जागांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लाखो पक्ष्यांचे वास्तव्याच्या पाणथळी जागांना सरंक्षण देण्याऐवजी सरकार त्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या १०-१२ किमी अंतरापर्यंत असलेल्या पाणथळींवरील स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्यही धोक्यात आल्याची भीती पर्यावरणवादी व सागर शक्तीचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी व्यक्त केली.
- उरणमधील बेलपाडा, भेंडखळ, पाणजे यासह नवी मुंबईतील एनआरआय, टीएस चाणक्य येथील जागांवर दररोज लाखोंच्या संख्येने विविध प्रकारचे दुर्मीळ जातीचे स्थलांतरित पक्षी स्थिरावतात. मात्र, स्थलांतरित पक्ष्यांच्या वास्तवाच्या या जागा वाचवण्याऐवजी भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी पाणथळींत येणारे प्रवाह रोखून पक्ष्यांना खाद्य मिळणार नाही यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.