आरेतील नरभक्षक बिबट्याला अखेर पकडले; वनविभागाला मोठे यश
By मनोहर कुंभेजकर | Published: October 26, 2022 09:26 AM2022-10-26T09:26:59+5:302022-10-26T09:27:25+5:30
आरे कॉलनीमधील वस्त्या, पाड्यांवर बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. अधूनमधून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनाही घडत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई- आरे युनिट क्रमांक 15 जवळ आज सकाळी ६.३० येथे लावलेल्या पिंजऱ्यात नरभक्षक बिबट्याला पकडण्यात यश आले.जोगेश्वरीचे स्थानिक आमदार व माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी लोकमतला या शुभवर्तमानाची माहिती दिली. नरभक्षक बिबट्याला तात्काळ पकडण्याच्या वनविभागाच्या अधिकार्यांना वायकर यांनी सूचना दिल्या होत्या. मात्र इतिकावर हल्ला करणारा हाच तो बिबट्या आहे का याचा वनविभाग शोध घेत आहे असे त्यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,आरे कॉलनीमधील वस्त्या, पाड्यांवर बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. अधूनमधून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनाही घडत असतात. गेल्या रविवारी दिवाळीत ६.३० च्या सुमारास आरे दुग्ध वसाहतीतील युनिट क्रमांक १५ मध्ये वास्तव्यास असलेले अखिलेश लोट यांची दीड वर्षाची मुलगी इतिका गायब झाली होती. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या घटनांमुळे आरेतील विविध पाड्यांमधील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
लोट कुटुंबिय आणि त्यांच्या शेजारच्या रहिवाशांनी घराच्या आसपास आणि जंगलात इतिकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळाने घरापासून काही अंतरावर इतिका जखमी अवस्थेत सापडली. तिला तात्काळ मरोळच्या सेवन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या हल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी गिरीजा देसाई आणि त्यांच्या टीमने गेली दोन दिवस येथे रात्री गस्त ठेवली होती.विशेष म्हणजे गिरीजा देसाई यांची घरी दीड वर्षाची मुलगी आणि दिवाळी सण असतांना त्यांनी
नाईट पेट्रोलिंग मध्ये आपल्या टिम बरोबर सहभाग घेतला होता.
दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या आरेतील युनिट क्रमांक १५ मधील मुलीच्या कुटुंबियांची तसेच जिकडे बिबट्याने हल्ला झाला त्या ठिकाणची आमदार रविंद्र वायकर यांनी काल भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि आर्थिक मदत केली. एवढेच नव्हे मृत मुलीच्या कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार आठवड्याभरात नुकसान भरपाईची रक्कम कुटुंबाला देण्यात यावी, अशी सूचना यावेळी त्यांनी वनविभागाच्या अधिकार्यांना केली.यावेळी वनविभागाचे अधिकारी मल्लीकार्जुन,वनअधिकारी गिरीजा देसाई यावेळी उपस्थित होते.