मुंबई - आरे कॉलनीतील जंगलाला सोमवारी (3 डिसेंबर) सायंकाळी आग लागल्याची घटना घडली होती. वृक्ष आणि सुक्या गवताने पेट घेतल्याने तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात आगीचा भडका पसरला. आरे कॉलनीच्या जंगलात लागलेल्या आगीतून संशयाचा धूर येत आहे. आग लागली की लावली? याबाबत वनखात्याने तात्काळ चौकशी करावी अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. तसेच या आगीसंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं कदम यांनी सांगितलं.
मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने आगीच्या घटना घडत असतानाच सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोरेगाव पूर्वेकडील आरेकॉलनीमधील जंगलाला आग लागली. मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली आहे. तब्बत सहा तासांनंतर अग्निशामक दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
आगी लागण्यामागे संशयाचा धूर
डोंगर परिसरात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी येथे आग लागल्याची घटना घडली होती. तेव्हा स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले होते. मात्र या आगी लागत नसून त्या लावल्या जात असल्याचा संशय स्थानिकांना आहे. त्यामुळेच याबाबत स्थानिक प्रशासनाने सज्ज राहावे, असेही प्राणिमित्र संघटना आणि पर्यावरणवादी संघटनांचे म्हणणे आहे.