वनपट्ट्याच्या जमिनी भूमाफियांच्या घशात
By admin | Published: June 25, 2015 11:20 PM2015-06-25T23:20:06+5:302015-06-25T23:20:06+5:30
वनहक्क अधिनियमानुसार आदिवासींना वाटप करण्यात आलेल्या वनजमिनी मुंबईच्या भूमाफियांनी बेकायदेशीर साठेकरार करून विकत घेऊन तेथे हॉटेल, धाबे व फार्महाऊसचा
अनगाव : वनहक्क अधिनियमानुसार आदिवासींना वाटप करण्यात आलेल्या वनजमिनी मुंबईच्या भूमाफियांनी बेकायदेशीर साठेकरार करून विकत घेऊन तेथे हॉटेल, धाबे व फार्महाऊसचा सपाटा लावून येथील आदिवासींना बेघर करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे मुख्य वनसंरक्षक ठाणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर केलेले साठेकरार नोटरी करून केलेले पुरावे प्रति पुरावा म्हणून सादर केल्याने भूमाफियांसह त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या पडघा विभागातील वनअधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे.
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ आणि नियम २००८ अनुसार आदिवासींना वनपट्टे म्हणून महसूल विभाग व वनविभागाने वाटप केले. कायद्यानुसार या जमिनींची मशागत करून आदिवासींनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना शासनाने दिल्या आहेत. प्रत्यक्षात जमिनींचे प्लॉट मुंबइर् - नाशिक महामार्गालगत असल्याने या जमिनींना मोठी किंमत आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीवर डोळा ठेवून स्थानिक इस्टेट एजंटांना (दलालांना) हाताशी धरून या भूमाफियांनी त्या विकत घेतल्या आहेत. त्यालगत असणाऱ्या मोकळ्या जागेवरही अतिक्रमण करून हॉटेल, ढाबे उभारून लाखोंची माया जमवत आहेत. काहींनी फार्महाऊस उभारले आहेत. संपूर्ण वनजमिनीला वॉल कम्पाउंडचे बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. तालुक्यातील पडघा वनक्षेत्रपालांच्या वडपे व पाच्छापूर वनपालांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या धामणगाव, वडपे, येवई, मोहडूळ, राहूर, डोहळे या गावांतील आदिवासी कुटुंबीय भिवा बारकू टोकरे (सर्व्हे नं. ११८), लक्ष्मण रूपजी वाघात, शांताराम टोकर (सर्व्हे नं ११८), रघुनाथ टोकरे, देवराम खुलात (सर्व्हे नं. १२७-ब), शांताराम मेघवेल, लक्ष्मण मेघवेल (सर्व्हे नं. ११७), रावजी वरठ, लक्ष्मण काळू डाके, भीमाबाई डाके, गोविंद मेघवाले, रूपजी वाघात (सर्व्हे ११७-११८) या जमिनी मुंबईच्या औरंगजेब बिस्मिल्लाह सिद्दीकी या एका भूमाफियाने विकत घेतले आहेत. सुकऱ्या धिंडे, बाळाराम काटकरी, अनंता माळी या जमिनी बिपिन पटेल अशा अनेकांनी विकत घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. वनजमिनीवर वनपट्टे प्लॉट व इतर वनजमिनींमध्ये झाडांची कत्तल करून जमिनीचे सपाटीकरण करून हजारो ट्रक लाल माती मुंबईच्या फार्महाऊसला विक्री करणाऱ्या या भूमाफियांवर कारवाई करणाऱ्या संबंधित वन अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी होत आहे. (वार्ताहर)