नांदगाव : मुरूड शहरात आॅक्टोबरमध्ये मोठे वादळ झाले होते. यावेळी शहरी परिसरात मोठे नुकसान झाले होते. मोठमोठी नारळाची झाडे विद्युत वाहिनीवर पडल्याने वीज खंडित झाली होती. या वादळाचा फटका तहसील कार्यालयाशेजारी असणाऱ्या वनखात्याच्या कार्यालयाला बसला होता. याठिकाणी झुणका-भाकर केंद्राजवळ असणारे मोठे झाड वादळामुळे वनखात्याच्या कार्यालयावरच कोसळल्याने संपूर्ण कौले व सिलिंग तुटून या कार्यालयाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज वनखात्याच्या विश्रामगृहात हलविण्यात आले आहेत. आता या घटनेला जवळपास दीड महिना उलटला तरी या कार्यालयाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. कार्यालय स्थलांतरित केल्याने वनखात्याचे अधिकारीही दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहे. याठिकाणी ३५ सेक्शनचे दाखले व इतर आवश्यक दाखल्यांसाठी नागरिकांना हेलपाटे घालावे लागत आहेत. वनखात्याचे कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिकांची वर्दळ सतत असे, परंतु गेल्या दीड महिन्यापासून दुरुस्ती न झाल्याने कार्यालय पुन्हा सुरू होईल की नाही, अशी शंका नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता, केवळ टाळाटाळ करण्यात येत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
वन कार्यालय छताविनाच
By admin | Published: November 17, 2014 10:35 PM