Join us

जंगलांचे आरे की आगीचे आरे ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 10:35 AM

नवीन  वर्ष २०२४ सुरू झाल्यापासून अग्निशमन दलाकडे आगी लागल्याच्या आलेल्या तक्रारींपैकी तब्बल ३१ तक्रारी या आरे कॉलनीतील आगीबाबत होत्या.

मुंबई :आरे कॉलनीत आगी लागण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. जागा बळकावण्यासाठी किंवा अतिक्रमण करण्यासाठी या आगी लावल्या जातात, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र, आगीच्या घटना काही कमी झालेल्या नाहीत. नवीन  वर्ष २०२४ सुरू झाल्यापासून अग्निशमन दलाकडे आगी लागल्याच्या आलेल्या तक्रारींपैकी तब्बल ३१ तक्रारी या आरे कॉलनीतील आगीबाबत होत्या.

मुंबईतील एकूण आगींपैकी ६० टक्के आगी या आरे कॉलनीतील असतात, असे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. या आगीमुळे स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय आगीमुळे आरेतील  जैवविविधतेला हानी पोहोचत आहे. आरेत आगी   लागण्याचे प्रकार सतत घडत असतात.  आरेत  मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. अनधिकृत झोपड्या बांधण्याचे उद्योगही तेजीत असतात. 

 आरेतील मोकळ्या जागा हडपण्यासाठी, जागा बळकावून तेथे अनधिकृत बांधकाम करण्यासाठी एक लॉबी  कायम कार्यरत असते. ही मंडळीच आगी  लावतात. आगीनंतर तो भाग जळून बेचिराख होतो. त्या ठिकाणी पुन्हा हिरवळ फुलण्यास वेळ लागतो.  

 मोकळ्या झालेल्या जागेवर अतिक्रमण केले जाते. ही जागा रिकामी होती, तेथे हिरवळ किंवा जंगल नव्हते, असा दावा केला जातो, असे स्थानिकांनी सांगितले.

दिवसाढवळ्याही आगी लावण्याचे प्रकार :

आरेतील जागा गिळंकृत करण्यासाठी काही मंडळी कायम कार्यरत असतात. दिवसाढवळ्याही आगी लावण्याचे प्रकार घडत असतात. हे प्रकार करणाऱ्यांवर पाळत ठेवणे गरजेचे आहे.  त्यामुळे नेमके कोण लोक हे उद्योग करतात हे स्पष्ट होईल. त्यामुळे आरे प्रशासनाने आरे कॉलनीत कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनने केली आहे.

आरेच्या काही भागात रात्रीच्या वेळेस  दारूपार्ट्या जोरात चालतात. त्यामुळे येथे अनेकदा दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. विशेषकरून आरेतील टेकडीच्या भागात अशा  प्रकारच्या पार्ट्या चालतात. दारू पिणारे कार्यक्रम उरकल्यानंतर सिगारेटी ओढतात, यापैकी काहीजण जळती काडी खाली टाकतात. त्यामुळे सुके गवत पेट घेते, याकडे लक्ष वेधतात.

मुंबईतील एकूण आगींपैकी ६० टक्के आगी या आरे कॉलनीतील असतात, असे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. या आगीमुळे स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय आगीमुळे आरेतील  जैवविविधतेला हानी पोहोचत आहे. 

टॅग्स :मुंबईआरे