Join us

तिवरांची जंगले वरदान

By admin | Published: September 12, 2015 11:42 PM

महापालिका क्षेत्रामध्ये १,७४५ हेक्टर जमिनीवर तिवरांचे जंगल आहे. प्रदूषणाचा विळखा पडत चाललेल्या शहरासाठी हे जंगल वरदान ठरत आहे. या वृक्षांमुळे वर्षाला तब्बल

- नामदेव मोरे,  नवी मुंबईमहापालिका क्षेत्रामध्ये १,७४५ हेक्टर जमिनीवर तिवरांचे जंगल आहे. प्रदूषणाचा विळखा पडत चाललेल्या शहरासाठी हे जंगल वरदान ठरत आहे. या वृक्षांमुळे वर्षाला तब्बल ७,४६७ मेट्रिक टन कार्बन वातावरणातून वेगळा केला जात आहे. शहराची कवचकुंडले असणारे मँग्रोज विकासाच्या नावाखाली नष्ट केले जात असून, त्याच्या संवर्धनासाठी ठोस कार्यवाही करण्याची गरज आहे. नवी मुंबईला मागील काही वर्षांपासून प्रदूषणाचा विळखा पडत चालला आहे. हवा व ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. खाडी पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. दगडखाणींमुळे डोंगर नष्ट होत चालले आहेत. प्रदूषणामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्वत्र प्रदूषण वाढत असताना शहरात तब्बल १,७४५ हेक्टर जमिनीवर वसलेले तिवरांचे जंगल शहरासाठी वरदान ठरत असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालावरून स्पष्ट झाले आहे. महापालिका क्षेत्रामध्ये दिवा ते दिवाळेपर्यंत २२ किलोमीटरचा खाडीकिनारा लाभला आहे. खाडीला लागून तिवरांचे विस्तीर्ण जंगल आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास ५ हजार हेक्टर जमिनीवर तिवरांचे जंगल आहे. त्यामधील सद्य:स्थितीमध्ये शहरात तब्बल १,७५४ हेक्टरचा समावेश आहे. यामधील १,४७१ हेक्टर जमीन कांदळवन म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. जवळपास २७४ हेक्टर परिसर अद्याप जंगल म्हणून घोषित करण्यात आलेला नाही. तेही जंगल म्हणून घोषित करून तेथील तिवरांचे संवर्धन करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत. महापालिकेच्या पर्यावरण अहवालाप्रमाणे कोपरखैरणे परिसरात कार्बनचे प्रमाण वाढले आहे. शहरातील ध्वनी व हवा प्रदूषणामध्येही वाढ झाली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षलागवड करण्याची गरज आहे. तिवरांमुळेही पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होत आहे. खाडीकिनाऱ्याजवळील जमिनीची धूप थांबविण्याचे काम तिवरांचे जंगल करते. याशिवाय वादळ, सुनामीसारखी संकटे आली तर त्यापासून शहरवासीयांचे रक्षण करण्याची क्षमता या जंगलामध्ये आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वातावरणातील कार्बन वेगळा करण्याची भूमिका तिवरांचे जंगल बजावत आहेत. जागतिक तापमानात वाढ करणाऱ्या हरित वायूमध्ये घट करण्यामध्येही महत्त्वाची भूमिका या वृृक्षांमध्ये आहे. प्रत्येक वर्षी तब्बल ७४६७ मेट्रिल टन कार्बन वेगळा केला जात आहे. टेरी या संस्थेने केलेल्या अभ्यासाप्रमाणे नवी मुंबई शहराचे कार्बन फुट प्रिंटचे प्रमाण २.८ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्षी एवढे आहे. यामधील ०.२६ कार्बन खारफुटीमुळे वेगळा होत आहे. शहरवासीयांसाठी सुरक्षाकवच व प्राणवायूप्रमाणे काम करणारे हे जंगल वाचविण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याची वेळ आली आहे. सुरक्षारक्षक नेमण्याची गरज : वन विभागाने अनेक ठिकाणी पाट्या लावून मँग्रोज तोडणे कायद्याने गुन्हा असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु एवढी उपाययोजना पुरेशी नाही. शहरातील मँग्रोजची कत्तल रोखण्यासाठी वन विभागाने सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची गरज आहे. काही ठिकाणी जळणासाठीही मँग्रोजची कत्तल केली जात आहे. महापालिकेने डेब्रीज मँग्रोजवर पडणार नाही यासाठी भरारी पथके नेमून अतिक्रमण थांबविले पाहिजे. महापालिका क्षेत्रामध्ये विकासासाठी मँग्रोजची कत्तल केली जात आहे. सिडकोेने मँग्रोज परिसरातही भूखंडांचे वाटप केले आहे. नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, घणसोली परिसरात मँग्रोजवर डेब्रीज टाकले जात आहे. मँग्रोजकडे जाणारा पाणीपुरवठा बंद करून जंगल नष्ट करण्यात येत आहे.सीवूडमध्ये उरण रेल्वेचा मार्ग बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मँग्रोज नष्ट करण्यात आले आहे. पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात असताना त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. सद्य:स्थितीमध्ये १७४५ हेक्टर जमिनीवर मँग्रोज आहे. परंतु त्यामधील १,४७१ हेक्टर क्षेत्रच कांदळवन म्हणून घोषित केले आहे. उर्वरित परिसरही कांदळवन म्हणून घोषित करण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. विकासाच्या नावाखाली शहरात मँग्रोज नष्ट केले जात आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविला नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. - सुकुमाल किल्लेदार, अध्यक्ष, सेव्ह मँग्रोव्हज अँड नवी मुंबई एक्झिस्टंस