मुंबईच्या शिल्पकाराचा प्रशासनाला विसर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 05:22 AM2020-02-11T05:22:30+5:302020-02-11T05:22:47+5:30
नाना शंकरशेठ यांच्या पणतूची व्यथा; एका स्टेशनला नाव देण्याची मागणी
विहार तेंडुलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आधुनिक मुंबईचे एक शिल्पकार नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांनी भारतात रेल्वे आणली, पण दुर्दैवाने आज एकाही स्थानकाला त्यांचे नाव नाही. प्रशासनाला त्यांचा विसर पडला आहे. मुंबई सेंट्रल स्टेशनला नानांचे नाव द्यावे, अशी मागणी आहे. आम्ही रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनाही भेटलो. त्यांनी हिरवा कंदील दिला आहे. पुढील एक-दोन आठवड्यांत राज्य मंत्रिमंडळासमोर असा प्रस्ताव संमत होईल, अशी आशा नाना शंकरशेठ यांचे पणतू सुरेंद्र विनायक शंकरशेठ यांनी व्यक्त केली.
नानांची सोमवारी २१८वी जयंती होती. त्यानिमित्त जळगावात एका कार्यक्रमासाठी आले असताना, सुरेंद्र शंकरशेठ यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, नानांनी लंडनमध्ये रेल्वे पाहिली. त्यांनी ब्रिटिश सरकारकडे विनंती केल्यानंतर मुंबईत रेल्वेच्या कामाला गती मिळाली. रेल्वेच्या त्यावेळच्या बोर्ड आॅफ डायरेक्टरमध्ये पाच सदस्य होते, तीन ब्रिटिश व दोन भारतीय. भारतीयांमध्ये एक जगशेदजी जीजीभॉय व नाना शंकरशेठ.
नानांनी तत्कालीन व्हीटी स्टेशनच्या कार्यालयासाठी स्वत:ची जागाही दिली. एवढेच नाही, तर हा प्रकल्प उभारणीसाठी निधीही दिला. मुंबईचा कारभार पूर्वी ज्या टाउन हॉलमधून चालायचा, त्याची उभारणीही नानांनी केली. त्यांचे नाव रेल्वे स्थानकाला द्यावे, असे आजपर्यंत कोणालाच वाटले नाही. रेल्वेकडूनही यापूर्वी सकारात्मक निर्णय झाले नाहीत.
नानांनी संपत्तीचा त्याग करून रेल्वे आणली, त्यांची ओळख कुठेतरी निर्माण व्हावी. पुढील पिढीला नानांचे कार्य समजावे, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईबाबत विचारल्यावर ते म्हणाले, या महानगराचा प्रश्न खूपच गंभीर बनला आहे. आता स्थानिक लोक मुंबई सोडून चालले आहेत आणि बाहेरून येणाऱ्या लोेकांनीच मुंबई भरून गेली आहे. बाहेरून येणाºया कुणालाही मुंबईची दारे बंद व्हावीत, अशी आमची भूमिका नाही. कारण तेही भारताचेच सुपुत्र आहेत, पण त्याला कोठेतरी मर्यादा असावी. वडाळ्याला नानांचे स्मारक बांधण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजनही झाले आहे. दानशूर लोेक पुढे येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
मुंबईत आमचाही जीव गुदमरतो
नानांनी मुंबईची निर्मिती केली, पण आज दुर्दैवाने मुंबईत आमचीही घुसमट होऊ लागली आहे. आपण गिरगावात राहतो, तेथे एवढी गर्दी आहे की बाहेर पडलो, तरी जीव गुदमरतो.
- सुरेंद्र शंकरशेठ, नाना शंकरशेठ यांचे पणतू