आश्वासनांचाच विसर, प्रदूषणमुक्तीला ठेंगा; पालिकेच्या उपाययाेजनांवर प्रत्येकाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 08:28 AM2023-04-12T08:28:29+5:302023-04-12T08:28:52+5:30
मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या जाहीरनाम्यात पर्यावरणाला अढळ स्थान देत आश्वासने हवेत विरली.
रतींद्र नाईक
मुंबई :
मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या जाहीरनाम्यात पर्यावरणाला अढळ स्थान देत आश्वासने हवेत विरली. प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर मात्र, पर्यावरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यानच्या काळात प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासकीय युक्त्याही योजल्या गेल्या. मात्र, प्रदूषण चढेच राहिले. त्यात स्मॉग टॉवरने आगीत ठिणगी टाकली आणि कृती दलासोबतच पालिकेच्या प्रदूषणमुक्ती नाऱ्यावर राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठविली. आता सर्वपक्षीय नेत्यांनी पालिकेच्या प्रदूषण उपाययोजनांच्या कृतीवरच टीका सुरू केल्याने महापालिका निवडणूक येईपर्यंत प्रदूषण निवळले नाही, तर यंदाच्या निवडणुकीत प्रदूषणाचा मुद्दा गाजणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत टोलेजंग टॉवर उभे राहत असून, इमारतींच्या बांधकामांमुळे धुळीचे साम्राज्य प्रचंड वाढले आहे. या बांधकामांमध्ये इतरही विकासकामांचा समावेश आहे. बोरीवली-गोराई ९४२, अंधेरी-विलेपार्ले-जोगेश्वरीत ९३३ बांधकामे, अंधेरी पश्चिमेस ८१५, डोंगरीत ८३, फोर्ट परिसरात १०१ व मुंबईतील इतर परिसरात हजारोंच्या संख्येने बांधकामे सुरू आहेत. या बांधकामामुळे मुंबईच्या हवेवर परिणाम होत असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृतिदल काम करणार आहे. प्रत्येक वॉर्डात तीन कृतिदल पाठविण्यात येणार असून, प्रदूषण रोखण्याची जबाबदारी या कृतिदलाची राहणार आहे. हे कृतिदल १ एप्रिलपासून बांधकामाच्या ठिकाणी जाऊन नियमावलीनुसार काम होते की नाही हे तपासणार असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास काम रोखणार आहे. सहायक अभियंता, उपअभियंता, वैद्यकीय अधिकारी यांचा या कृतिदलात समावेश आहे. सहायक आयुक्तांकडून कृतिदलाच्या कामांचा आढावा घेतल्यावर त्याचा अहवाल अतिरिक्त पालिका आयुक्तांना सादर करणार आहे. मात्र, कृतिदल स्थापन न झाल्याने पालिकेला वायुप्रदूषणाचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
महापालिकेचे अनेक आदेश केवळ कागदोपत्रीच मर्यादित आहेत, याचे ताजे उदाहरण महापालिकेच्या वायुप्रदूषण नियमांमध्ये दिसून येते. पालिका वायुप्रदूषणाचा सामना करण्यासाठी प्रभाग स्तरावर समिती स्थापन करून, अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी वॉर्डांना दिल्या. मात्र, आयुक्तांच्या निर्देशानंतरही याची अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळे पालिका किती गंभीर आहे, हे दिसून येते.
- रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, काँग्रेस.
मुंबईची हवा दिवसेंदिवस बिघडत आहे. मात्र, पालिकेला याचे गांभीर्यच नाही. कृतिदल स्थापन करण्याचे आदेश दिल्यानंतर दहा दिवस उलटूनही त्याची अंमलबजावणी होत नाही, यावरून पालिका किती गंभीर आहे, हे कळते. आता तरी पालिकेने लवकरात लवकर धूळ नियंत्रणात आणणारे कृतिदल स्थापन करावे,
- संदीप देशपांडे, माजी नगरसेवक, मनसे.
पालिका प्रशासन आपल्या कामांची जाहिरात करण्यासाठी अनेक घोषणा करते, त्यापैकी ही एक घोषणा आहे. पालिकेची कृती मात्र शून्य असते. प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार यापुढेही असाच सुरू राहणार.
- राखी जाधव,
माजी नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस.