Join us

दिवाळीत विमान प्रवास विसरा; ९० टक्क्यांनी तिकिटे महागली, आगाऊ बुकिंग करूनही फायदा नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:55 PM

Plane Tickets: नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुटीसाठी जर तुम्ही विमान प्रवासाद्वारे पर्यटन करणार असाल, तर त्यासंबंधात योजना आखण्यापूर्वी ही बातमी वाचा.

मुंबई - नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुटीसाठी जर तुम्ही विमान प्रवासाद्वारे पर्यटन करणार असाल, तर त्यासंबंधात योजना आखण्यापूर्वी ही बातमी वाचा. कारण  सुट्यांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी विमानांच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण केले असून त्यांना गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल ९० टक्के अधिक पैसे मोजावे लागले आहेत. मागणी जास्त व पुरवठा कमी यामुळे ही दरवाढ झाली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, मुंबई, दिल्ली, गोवा, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, कोलकात्ता, श्रीनगर या आणि अशा विविध प्रमुख शहरांकरिता विमान सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या तिकिटांच्या दरात १० ते १६ नोव्हेंबर या कालावधीसाठी घसघशीत वाढ झाली आहे. यापैकी काही मार्गांवर एकेरी प्रवासाचे तिकीट ८ हजार ते २२ हजार रुपयांवर पोहोचल्याचे दिसून येत आहे. तर दुहेरी प्रवासाचे तिकीट देखील याच पटीत दुपटीने वाढलेले आहे.

सणासुदीच्या काळात प्रवासी संख्येत वाढ२०२२ या वर्षामध्ये सणासुदीच्या काळात देशात एकूण १ कोटी १४ लाख लोकांनी विमान प्रवास केला. यंदा जून-जुलै या दोनच महिन्यांत तब्बल १ कोटी ४५ लाख लोकांनी प्रवास केला आहे. यंदाच्या वर्षी विमान प्रवासी संख्येचा उच्चांक गाठला जाण्याचे संकेत मिळत आहेत. 

मागणी, पुरवठा यात तफावत बहुतांश लोक वेळ वाचविण्यासाठी विमानाचा पर्याय निवडतात. मात्र, ही दरवाढ पाहता हा खर्च आवाक्याबाहेर आहे. या दरवाढीमागचे प्रमुख कारण म्हणजे, गेल्या मे महिन्यापासून गो-फर्स्ट कंपनीची ५६ विमाने सेवेतून बाद झाली आहेत. तर स्पाईस जेट कंपनीच्या विमानांनाही काही प्रमाणात घरघर लागली आहे. तसेच, इंडिगाे, एअर इंडिया व अन्य कंपन्यांनी ज्या नव्या विमानांची खरेदी केली आहे त्यांना ही विमाने नजीकच्या भविष्यात तरी मिळणार नाही. परिणामी मागणी व पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. 

 देशातील नव्या शहरांत आता विमानतळांची निर्मिती झाल्याने विमान कंपन्यांनी तेथे सेवा सुरू केली आहे. सोय उपलब्ध झाल्यामुळे अनेक प्रवासीही विमान प्रवासाला पसंती देत असल्याने प्रवाशांची संख्याही लक्षणीय वाढत आहे. याचा परिणामही दरवाढीच्या रूपाने दिसून येत आहे.

असे आहेत दर (दुहेरी प्रवास) मुंबई ते श्रीनगर     ३५,२२८ रु.मुंबई ते दिल्ली     १८,९४४ रु.मुंबई ते अहमदाबाद     ११,४८० रु.मुंबई ते कोलकाता     २५,३३९ रु.मुंबई ते बंगळुरू     १०,६८८ रु.मुंबई ते चेन्नई     १५,६३९ रु.

टॅग्स :विमानदिवाळी 2022