लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयांत १५ ऑगस्टपासून मोफत उपचार देण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर रुग्णांना वा त्यांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणण्याची चिठ्ठी न देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. रुग्णांना काही तक्रारी असल्यास १०४ या टोल फ्री क्रमांकावर त्याची नोंद करता येणार आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात रुग्ण वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात येत असतात. त्यामध्ये मुंबईत सर जे. जे. समूह रुग्णालयाचा समावेश आहे. या ठिकाणी मोफत औषधे केव्हा मिळणार असा प्रश्न रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांमधून विचारला जात आहे.
आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी मोफत उपचारासंदर्भात सविस्तर पत्रक काढले आहे. त्यात १५ ऑगस्टपासून मोफत उपचारांची अंमलबाजवणी करण्यासंदर्भात सूचना केली आहे. रुग्णांना स्वतःच्या खिशातील पैसे मोजून या गोष्टी विकत घ्याव्या लागतात. रुग्णालयात केस पेपरसाठी २० रुपयांपासून पुढे लागणाऱ्या चाचण्या, शस्त्रक्रियेसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते.
- क्वचित बाहेरील औषधे रुग्णास द्यायची गरज लागल्यास रुग्ण कल्याण समितीच्या अनुदानातून औषध खरेदी करून रुग्णास मोफत उपलब्ध करून द्यावे.
- सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या अंतर्गत जी. टी. हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील कामा हॉस्पिटल आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयाचा समावेश आहे.
- चारही रुग्णालयात शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात. त्यासाठी मुंबई बाहेरून रुग्ण येत असतात. अनेकवेळा या रुग्णालयात औषधे आणि शस्त्रक्रियेशी संबंधित लागणाऱ्या गोष्टी या रुग्णालयाबाहेरून आणाव्या लागतात.
- शुल्क आकारल्याचे आढळल्यास संबंधितावर कारवाईची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची असेल.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी रुग्णालये हे दोन्ही वेगळ्या विभागातील आहेत. आमच्याकडे अजून कुठल्याही प्रकारच्या सूचना आलेल्या नाहीत. - डॉ. संजय सुरासे, अधीक्षक, सर जे. जे. रुग्णालय
जे. जे. रुग्णालय सरकारचे आहे. या ठिकाणी महात्मा फुले योजना आहे. मात्र, रुग्णाला कधी संध्याकाळच्यावेळी इमर्जन्सीमध्ये दाखल करण्याची वेळ आली तर सर्व औषधे बाहेरून विकत आणावी लागतात असा माझा अनुभव आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात ज्या पद्धतीने निर्णय घेण्यात आला. त्याच प्रकारचा निर्णय जे. जे. रुग्णालयाच्या प्रशासनानेही घेतला पाहिजे असे वाटते. - जितेश बारगळ, नातेवाईक