मुंबई - केवळ पीक कर्ज माफ करणे हा कर्जमाफीचा मर्यादित अर्थ न ठेवता शेतक-यांवरील सर्व प्रकारचे कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.शेती, शेतीपूरक कर्जे (ट्रक्टर खरेदी, सूक्ष्म सिंचन), जलवाहिनी, विहीर, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, ग्रीन हाउस-पॉलीहाउस उभारणीसाठी घेतलेले कर्ज, साठवणुकीची साधने यावरील कर्जेही माफ करावीत, अशी मागणी समितीने केली.तसेच, शेतक-यांकडील दुधाला शासनाच्या निर्णयाप्रमाणे किमान २७ रुपये लीटरचा भाव द्यावा, आतापर्यंत यापेक्षा कमी दराने झालेल्या खरेदीतील फरकाची रक्कम शासनाने शेतकºयांना द्यावी, कापूस बोंडअळीने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून एकरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, कांद्यासह सर्व शेतमालावरील निर्यातबंदी विनाअट उठवावी, शेतमालाच्या खरेदीची शासकीयकेंद्रे तातडीने सुरू करावीत; तसेच शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.याशिवाय, राज्य सरकारने ऊस दराचा गुजरात पॅटर्न राज्यात अंमलात आणावा, दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट तत्काळ रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली.या वेळी सुकाणू समितीचे नेते रघुनाथदादा पाटील, डॉ. अजित नवले, बाळासाहेब पटारे, सुशीला मोराळे, किशोर ढमाले, कालिदास अपेट, खंडू वाकचौरे, गणेशकाका जगताप आदी उपस्थित होते.
शेतक-यांवरील सर्व कर्ज माफ करा, सुकाणू समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 4:43 AM