Join us

"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 3:22 PM

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगावमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

मुंबई : मनसे नेते राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगावमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच, कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी मिश्किल वक्तव्य केलं आहे. भारताच्या राष्ट्रपतींकडे माझी एक विनंती आहे मला खून माफ करा. ज्यानं मोबाईलमध्ये कॅमेरा आणला, त्याचा मला खून करायचा आहे, असं मिश्कील वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे मैदानात उतरली आहे. ही निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. त्यासाठी अलिकडेच राज ठाकरेंनी राज्यातील विविध भागात जाऊन चाचपणी केली. याच पार्श्वभूमीवर मनसेकडून गोरेगाव येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले. यावेळी रतन टाटा यांच्यासंदर्भातील आठवणी राज ठाकरेंनी जागवल्या. तसंच, मोबाईलमुळं होणाऱ्या त्रासाचा विषय राज ठाकरेंनी उपस्थित केला. 

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रपतींकडे माझी एक विनंती आहे. मला एक खून माफ करा. ज्यांना मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना, त्याचा मला खून करायचा आहे. सर्वांना फोटो देणं शक्य होत नाही हो, एकानं तोंडाजवळ कॅमेरा आणला. मी म्हटलं नाकातील केस काढायचे आहेत का? कशासाठी फोटो. वर्धापन दिन, वाढदिवस असेल तरी फोटो काढतात. एखाद्याचा फोटो नसेल तर समजू शकतो. दरवर्षी फोटो काढतात. हा आजार आहे. या गोष्टी थांबल्या पाहिजे. मला त्रास होतो. अनेकांना त्रास होतो. पण त्यामुळं मी महाराष्ट्र सैनिकांना भेटू शकलो नाही. पुढच्यावेळी जास्तीत जास्त महाराष्ट्र सैनिकांना भेटेन, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

जगात खूप कमी व्यक्ती आहेत, ज्यांच्या आपण पाया पडावे, असे वाटते. त्यात रतन टाटा होते. अनेक वेळा त्यांना मी भेटलो. अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकलो. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या.  त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. रतन टाटा हे देशाचे मानबिंदू होते. रतन टाटांकडून जगाला अनेक गोष्टी मिळाल्या. वनखात्याच्या जमिनीकडे दुर्लक्ष केलं तर झोपड्या होणार. त्यासाठी मी रतन टाटांकडे एक आराखडा घेऊन गेलो होतो. त्याचं बजेट 3.5 कोटी रुपये होते. मात्र, बजेट वाढतंय काय करायचं. असं रतन टाटा कधी म्हणाले नाहीत, असं राज ठाकरेंनी सांगितलं. 

पुढे ते म्हणाले, बजेट 3.5 कोटींवरून 14 कोटींवर गेलं, पण रतन टाटा थांबले नाहीत. उलट ते म्हणाले अजून काही असेल तर सांगा. मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. त्यानंतर मी त्यांना दुसरा प्रोजेक्ट सांगितला. तो म्हणजे वरळीपासून ते माहिमपर्यंतचा अख्खा प्रोजेक्ट त्यांना मी सांगितला. त्यांनी सगळी माणसं कामाला लावली. पण आपल्याकडे काय आहे. एखादी गोष्ट करत असताना पैसे खायला मिळाले नाहीत तर अडथळे कसे आणता येतील. याच्यासाठी सर्वजण टपलेले असतात. रतन टाटांसारखे सरळ, सभ्य लोक तुम्हाला आवडतात मग राजकारणी सभ्य का आवडत नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.

सध्याच्या राजकारणावर टीकागद्दारी करणारा तुम्हाला का आवडतो. आमदार फोडाफोडी करायची आणि राजकारण तापवायचं. एखाद्या पक्षासोबत निवडणुका लढवायच्या आणि परत दुसऱ्या पक्षात जायचं आणि सत्तेमध्ये बसायचं. हेच गेल्या पाच वर्षात आपण बघत आहोत. मग नक्की तुम्हाला आवडते काय? आज जर महाराष्ट्रातील जनतेने निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बर्बाद झाला म्हणून समजा. नको त्या विषयांची घाण पसरत जाणार सगळीकडे, असे राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :राज ठाकरेमनसेमुंबईराजकारणमहाराष्ट्र