लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कांदिवली पश्चिमेमधील एका स्टेशनरीच्या दुकानात उघड्या ग्रीलमधून प्रवेश करत चोरट्यांनी शेकडो छत्र्या पळवून नेल्या. दुकानदार ग्रीलला लॉक लावण्यास विसरला आणि त्याचाच फायदा त्यांनी घेत छत्र्या ठेवलेले बॉक्स उचलून नेले. या प्रकरणी कांदिवली पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ जुलै रोजी उशिरा रात्रीपर्यंत ओम कलेक्शन या दुकानाचे मालक गिरीश वाविया (२४) हा स्टेशनरीची बिले बनवित बसला होता. काम संपल्यानंतर तो निघाला. मात्र निघताना त्याने दुकानाचे लोखंडी मुख्य शटर बंद केले. तर बाहेर छत्रीचे बॉक्स ठेवलेल्या ग्रीलचे लॉक लावायला विसरला. दुसऱ्या दिवशी त्याचा भाऊ नरेंद्र दुकान उघडण्यासाठी आला तेव्हा ग्रीलमध्ये ठेवलेले छत्रीचे बॉक्स अस्ताव्यस्त पडलेले त्याला दिसले. त्यातील छत्रीचे बॉक्सही गायब होते. त्यामुळे त्याने याबाबत गिरीशला सांगितले आणि तोही दुकानात धावत गेला. तेव्हा चोरट्यांनी आठ छत्रीचे बॉक्स रिकामे केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
शेतीच्या कामासाठी हे व्यापारी गुजरातला गेले होते आणि परतल्यावर त्यांनी १८ जुलैचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यामध्ये एक अनोळखी व्यक्ती हातात पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन उघड्या ग्रीलमधून आत शिरत जवळपास ४१ हजार किमतीच्या ९६ छत्र्या चोरताना दिसला. मुख्य म्हणजे पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी कॅमेऱ्याचा अँगलही फिरविला. या विरोधात सोमवारी तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.