लाॅकडाऊनविना कोरोनामुक्त राज्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 05:41 AM2021-04-23T05:41:40+5:302021-04-23T05:41:49+5:30
माजी मंत्री सुबोध सावजी यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लाॅकडाऊनशिवाय राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर महाराष्ट्राला अशा संकटातून बाहेर काढू शकणाऱ्या मान्यवरांची मोठी फळी महाराष्ट्रात आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन महाराष्ट्राला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर
काढून देशासमोर आदर्श निर्माण करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते
प्रकाश आंबेडकर, शिवसेना नेते संजय राऊत, प्रकाश पोहरे, सपाचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, खासदार
नवनीत राणा, प्रसिद्ध डाॅक्टर
तात्याराव लहाने, राज्यमंत्री बच्चू
कडू या मान्यवरांची राजकारण
विरहीत उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी सावजी यांनी
केली आहे.
राजकारण विरहित...
या सर्व मान्यवरांना राजकीय तसेच सामाजिक परिस्थितीची चांगली जाण आहे. शिवाय, आपत्ती आणि विपरित परिस्थितीवर मात करण्याचा गाढा अनुभव आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता या अनुभवी नेत्यांच्या अनुभवाचा फायदा घेत महाराष्ट्राला कोरोनाच्या विळख्यातून वाचविणे आवश्यक आहे. कोरोनामुक्तीसाठी राज्य सरकार नियोजनबद्धपणे शर्थीचे प्रयत्न करत आहेच. त्यात या सर्व मान्यवरांच्या राजकारण विरहित समितीचा राज्याला मोठा फायदा होणार आहे. त्यासाठी तातडीने या सर्व नेत्यांचा सहभाग असलेल्या सर्वपक्षीय समितीची स्थापना करावी आणि लाॅकडाऊनशिवाय महाराष्ट्राला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढावे, अशी मागणी सावजी यांनी केली आहे.