Join us  

वानखेडे स्टेडियमला पोलीस छावणीचे स्वरुप

By admin | Published: October 25, 2015 1:29 AM

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील एक दिवसीय मालिकेतील निर्णायक सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर होत असून त्यानिमित्त येथे प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुंबई : भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील एक दिवसीय मालिकेतील निर्णायक सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर होत असून त्यानिमित्त येथे प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवसेनेची पाकिस्तानविरुद्धची भूमिका व त्याबाबत केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ४० अधिकाऱ्यांसह ५०० पोलिसांचा फौजफाटा याठिकाणी तैनात असल्याचे सांगण्यात आले. गेल्या सोमवारी पाकबरोबरच्या नियोजित क्रिकेट मालिकेबाबत चर्चा करण्यासाठी क्रिकेट संघाच्या पदाधिकाऱ्यांची पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांच्याशी येथील बीसीसीआय सेंटर बैठक होणार होती. मात्र शिवसैनिकांनी कार्यालयात घुसून आंदोलन करीत बैठक उधळून लावली. त्यानंतर गुरुवारी झालेल्या दसरा मेळाव्यातही सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका करीत पाकला विरोध कायम असणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे रविवारी कोणतीही अनुचित घटना न घडण्यासाठी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी योग्य खबरदारी घेतली आहे. त्यांच्या सूचनेनुसार बंदोबस्तासाठी दोन पोलीस उपायुक्त, सहा सहाय्यक आयुक्त, १० निरीक्षक ३० फौजदार आणि ४५० पोलीस तैनात असतील, त्यामध्ये ५० महिला कॉन्स्टेबलचा समावेश असणार आहे. त्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या ८ तुकड्यांसह, शिघ्रकृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक आणि वाहतुक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन्ही संघातील खेळाडू व प्रशिक्षक हॉटेल ट्रायडंट येथे वास्तव्यास असल्याने शुक्रवारी रात्रीपासून त्याठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला असून २६ तारखेपर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे. याठिकाणी दक्षिण प्रादेशिक विभागातील ४ पोलीस अधिकारी, १४ सहाय्यक फौजदार यांच्यासह सशस्त्र पोलीस बलातील २८ पोलीस अंमलदार या ठिकाणी दिवसरात्र कार्यरत राहणार आहेत.