मुंबई - विद्यमान महापौर, उपमहापौर यांचा कार्यकाळ गुरुवारी संपुष्टात आला. त्यानुसार मुंबईच्या महापौर व उपमहापौरपदासाठी शुक्रवारी पालिका मुख्यालयात निवडणूक होईल.काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपने उमेदवार उभा न केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल. त्यानुसार महापौरपदी सेनेच्या किशोरी पेडणेकर आणि उपमहापौरपदी सुहास वाडकर यांच्या नावावर पालिकेच्या महासभेत शुक्रवारी शिक्कामोर्तब होईल. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे सेनेत इच्छुक ज्येष्ठ नगरसेवकांत रस्सीखेच सुरू होती. मात्र वरळी मतदारसंघात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विजयात मोठे योगदान असलेल्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना पक्षाने संधी दिली. राज्यात सेनेबरोबर सत्तेचे गणित जुळत असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने आपला उमेदवार उभा केला नाही. भाजपनेही ऐनवेळी माघार घेतली.शर्यतीत कोणताच राजकीय स्पर्धक नसल्याने सर्वाधिक तुल्यबळ शिवसेनेचाच महापौर व उपमहापौर असेल. निवडणूक शुक्रवारी सकाळी पालिका मुख्यालयात होईल. महापौर, उपमहापौरांचा कार्यकाळ अडीच वर्षे असतो. २०१७ मध्ये सत्तेत आल्यावर शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर महापौरपदी तर हेमांगी वरळीकर उपमहापौरपदी निवडून आल्या होत्या.
मुंबईच्या महापौर, उपमहापौरपदासाठी आज औपचारिक निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 3:31 AM