एका व्यक्तीच्या नावे १२ बँकांमधून बनावटरीत्या कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 02:53 AM2018-08-08T02:53:45+5:302018-08-08T02:53:49+5:30

न घेतलेल्या कर्जामुळे मुलुंडमधील एकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Formal loans from 12 banks in the name of one person | एका व्यक्तीच्या नावे १२ बँकांमधून बनावटरीत्या कर्ज

एका व्यक्तीच्या नावे १२ बँकांमधून बनावटरीत्या कर्ज

Next

मुंबई : न घेतलेल्या कर्जामुळे मुलुंडमधील एकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. तब्बल १२हून अधिक बँका आणि खासगी कंपन्यांकडून त्यांच्या नावावर कर्ज घेतल्याच्या माहितीने त्यांच्या भुवया उंचावल्या. कर्जाचा हप्ता न दिल्यामुळे त्यांचे खाते गोठवून एक हप्ता बँकेने काढण्यात आल्याच्या नोटीसनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्याने थेट पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांची तक्रार दाखल करून १० दिवस उलटले. मात्र, आरोपी अद्याप मोकाट आहे.
मुलुंड परिसरात योगेश भाटिया (३६) कुटुंबीयांसोबत राहतात. ते पवई परिसरात एका खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर नोकरीला आहेत. पवईतील एका बँकेत त्यांचे सॅलरी अकाउंट आहे. १८ मे रोजी त्यांना आलेल्या बँकेच्या नोटिशीत मोटारसायकलसाठी बँकेतून लोन घेतले असून, त्याचे हप्ते भरले नसल्याने अकाउंट गोठविले आहे व त्यातून ६ हजार ४२ रुपये काढून घेतल्याचे नमूद करण्यात आले होते.
मात्र, कुठलीही दुचाकी विकत घेतली नसताना आलेल्या या नोटिशीमुळे त्यांचा गोंधळ उडाला. त्यांनी थेट बँकेत धाव घेत चौकशी केली. तेव्हा ठाण्याच्या पत्त्यावर ते कर्ज घेतल्याचे सांगितले. मात्र, तेथे आपल्या नावावर कुठले घर नसल्याची माहिती त्यांनी बँकेला दिली.
याबाबत लेखी अर्ज दिल्यानंतर बँकेने चौकशी सुरू केली आणि त्यांच्या खात्यातून काढलेले पैसे परत खात्यात जमा केले.
पुढे भाटिया यांनी त्यांच्या पॅन कार्डवर किती कर्ज घेतले याची माहिती घेतली. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या नावावर विविध भागांतील ३ रहिवासी पत्ते दाखवून, त्यावर तीन फेक सिम कार्ड घेतलेले दिसून आले. शिवाय, १२ हून अधिक नामांकित बँकांसह विविध फायनान्स कंपन्यांकडून त्यांच्या नावे कर्ज घेतल्याचे दिसून आले. त्यांनी या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी २६ जुलै रोजी पवई पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून १० दिवस उलटले, तरी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही, अशी माहिती भाटिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोणाकडेही आपली वैयक्तिक कागदपत्रे देताना सावधानता बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले.
>तुम्हीही काळजी घ्या!
आपण नेहमी विविध कारणांसाठी आपली कागदपत्रे दुसऱ्यांकडे सादर करतो. मात्र, अशा वेळी त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा कधीही दुरुपयोग होऊ शकतो, असे तक्रारदार योगेश भाटिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Formal loans from 12 banks in the name of one person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.