अकरावीच्या सीईटीचे स्वरूप शाखेनुसार हवे; तीन विषयांत विभागणी करण्याची शिक्षण संस्थांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 09:54 AM2021-06-04T09:54:39+5:302021-06-04T09:54:52+5:30

शिक्षक आणि मुख्याध्यापक तसेच शिक्षण संस्थांनी सीईटी परीक्षेेत आवश्यक बदल करून सुसूत्रता आणण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना ज्या शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, त्यानुसार ही सीईटी असावी असे काहींचे मत आहे, तर सीईटीत जसे गुण मिळतील त्यानुसार शाखा निवडण्याची मुभा द्यावी असाही मतप्रवाह आहे. 

The format of the 11th CET should be branch wise | अकरावीच्या सीईटीचे स्वरूप शाखेनुसार हवे; तीन विषयांत विभागणी करण्याची शिक्षण संस्थांची मागणी

अकरावीच्या सीईटीचे स्वरूप शाखेनुसार हवे; तीन विषयांत विभागणी करण्याची शिक्षण संस्थांची मागणी

googlenewsNext

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी एकच सीईटी घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील गुणांनुसार, अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. ही सीईटी ऐच्छिक असली तरी ती देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात प्राधान्य दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शिक्षक आणि मुख्याध्यापक तसेच शिक्षण संस्थांनी सीईटी परीक्षेेत आवश्यक बदल करून सुसूत्रता आणण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना ज्या शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, त्यानुसार ही सीईटी असावी असे काहींचे मत आहे, तर सीईटीत जसे गुण मिळतील त्यानुसार शाखा निवडण्याची मुभा द्यावी असाही मतप्रवाह आहे. 

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सीईटीच्या स्वरुपाप्रमाणे ती १०० गुणांची आणि २ तासांची ऑफलाईन ओएमआर पद्धतीने (ऑप्टिकल मार्क रेकग्निशन) घेतली जाणारी बहुपर्यायी परीक्षा असेल. विद्यार्थी हे साधारणतः आपल्याला दहावीला कोणत्या विषयात किती गुण मिळाले आणि आपला कोणत्या विषयाकडे अधिक कल आहे, हे ठरवून त्याप्रमाणे अकरावी प्रवेशासाठी शाखेची निवड करतात.   

मात्र, विद्यार्थ्यांचे दहावीचे अर्धे मूल्यांकन हे यंदा त्यांच्या नववीच्या निकालावर आधारित असेल. त्यामुळे कोणत्या विषयात किती गुण आहेत? आपला कल कोणत्या विषयात अधिक असून, कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, हे ठरविण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येऊ शकतील. 

  त्यामुळे सीईटी प्रवेश परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करावेत, असे मत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सिस्कॉम संस्थेने मांडले.  

शिक्षण मंडळाने करावे सीईटीचे नियोजन 
सीईटी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्र अशा ३ विषयांत विभागलेली असावी. प्रत्येक विषयासाठी १०० अशी किमान ३०० गुणांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असावी.
एका सत्राऐवजी अर्ध्या तासाच्या अंतराने २ सत्रांत विभागून परीक्षा घेतल्यास, सर्व विषयांची सरासरी काढून अकरावी प्रवेशासाठी सरासरी मूल्यांकन ठरवता येईल. प्रत्येक विषयातील तपशीलवार गुणांच्या सहाय्याने विद्यार्थी, पालकांना कल ठरविणे सोपे होईल. 
राज्य परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांकडून दहावीच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क आकारले आहे. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने मंडळाकडे जमा असलेल्या या शुल्कातूनच मंडळाने सीईटीचे नियोजन करावे.
सीईटी परीक्षांमुळे दरवर्षी मंडळाचा परीक्षांवर होणार खर्च कमीच होणार आहे. अकरावी प्रवेशात प्राधान्य दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. 

शुल्क आकारू नये
अकरावीसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने खूप बदल आवश्यक आहे. त्यांना कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा, याचा अंदाज येण्यासाठी हे बदल आवश्यक आहेत. या परीक्षेसाठी शुल्क आकारू नये, हीच अपेक्षा आहे.
- वैशाली बाफना, 
सिस्कॉम संघटना

Web Title: The format of the 11th CET should be branch wise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.