संतोष आंधळे मुंबई : जी-२० परिषद पुढील वर्षी भारतात होणार आहे. मात्र, त्यानिमित्ताने वर्षभर विविध शहरांमध्ये महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर १३ ते १६ डिसेंबर या कालावधीत जी-२० सदस्य देशांच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मुंबईत येणार आहेत. त्यांच्या वैद्यकीय सुविधांसाठी जे. जे. रुग्णालयाच्या माध्यमातून २० पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.
आंतराष्ट्रीय स्तरावरील बैठकांच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांतून अतिमहत्त्वाच्या व्यक्ती देशात येतात, त्यावेळी राजशिष्टाचार विभागातर्फे त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केली जाते. त्यात वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असलेल्या पथकाचाही समावेश असतो. विदेशी पाहुणे मुंबईतून बाहेर जाईपर्यंत ही पथके त्यांच्यासाठी तैनात असतात.
१०८ क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्सवरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, १०८ क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्स या कामासाठी वापरण्यात येणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वैद्यकीय पथके तयार करणे, हे जे. जे. रुग्णालयाच्या प्रशासनासाठी नित्याचे काम आहे. याप्रकरणी, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर म्हणाले की, ‘यासंदर्भात जे. जे. रुग्णालय प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्व वैद्यकीय पथके तयार करण्यात आली आहेत.’
कोणाकोणाचा समावेशजी-२०च्या निमित्ताने होणाऱ्या डेव्हलपमेंट वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या वैद्यकीय पथकांत भूलतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, फिजिशियन, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका, एक ॲम्ब्युलन्स, वाहक, सहायक आदींचा समावेश असेल. अशी २० पथके तयार करण्यात आली असून, प्रत्येक पथकाला आठ तासाचे काम असेल. प्रत्येक पथकासोबत काही महत्त्वाची औषधे असतील. एखादा वैद्यकीय आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्यासाठी ही पथके काम करतील. ज्या ठिकाणी व्हीआयपी पाहुणे बैठकीसाठी उपस्थित असतील वा जिथे त्यांचा निवास असेल तिथेच ही पथके तैनात असतील.