विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत भावनांक दुर्लक्षितच
By admin | Published: June 10, 2015 04:16 AM2015-06-10T04:16:20+5:302015-06-10T04:16:20+5:30
एक्स्ट्रा करिक्युलम’च्या पंक्तीत बसविल्याने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत भावनांक दुर्लक्षितच राहिल्याची खंत राज्याचे शिक्षण मंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
मुंबई : शालेय अभ्यासक्रमात चित्रकला, गायन असो वा संगीत या विषयांना ‘एक्स्ट्रा करिक्युलम’च्या पंक्तीत बसविल्याने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत भावनांक दुर्लक्षितच राहिल्याची खंत राज्याचे शिक्षण मंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
पु.ल.देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटर सभागृहात प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव लिखित देवनागरी सुलेखन कित्ता ‘काना मात्रा वेलंटी’ या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. त्यावेळी तावडे बोलत होते. लिपी, कित्ते कालबाह्य होत असताना ते टिकून ठेवण्याचे आव्हान पालव यांनी पेलले असल्याचे सांगितले. शिवाय, अक्षरसंस्कृती जगवण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे. अक्षरसंस्कृती केवळ टिकवायचे नाहीतर वृद्धींगत करायचे कार्य पालव करत असल्याचेही तावडे यांनी अधोरेखित केले. विविध विषयांच्या माध्यमातून केवळ हुशार आणि तज्ज्ञ व्यक्ती निर्माण होतील परंतु परिपूर्णतेसाठी भावनांकही तितकाच महत्त्वाचा असल्याचे तावडे यांनी सांगितले.
आजच्या शॉर्टकटच्या जमान्यात कित्त्याची खरी गरज असल्याचे प्रकाशन सोहळ््याचे अध्यक्ष ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी सांगितले. मनुष्याचे जन्मत: कलेशी नाते असते, त्यामुळे ‘स्वत:ला काहीतरी वेगळं करायला जमत आहे’ ही भावनाच वेगळी असते. समाधानासाठी श्रीमंती नव्हे आनंद महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येकाने कित्ता गिरवलाच पाहिजे, असे मत काम यांनी मांडले. भारत जसा शेतीप्रधान आहे, तसा लिपीप्रधान असल्याचे भारतभ्रमण केल्यावर लक्षात आल्याचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी सांगितले. त्यामुळे किबोर्डमध्ये बोट अडकवण्यापेक्षा कित्ता गिरवावा, प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याच्या हाती कित्ता द्यावा असे आवाहन पालव यांनी केले. (प्रतिनिधी)
परीक्षा पद्धत मान्य नाही
एका प्रश्नाला केवळ एकच उत्तर ही परीक्षा पद्धत संपूर्णत: चुकीचीच असल्याचे परखड मत शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी मांडले. म्हणजेच, विद्यार्थ्यांना चाकोरीबद्धते पलिकडे विचार करण्यास वाव न देणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे केवळ पाठ्यपुस्तकी ठोकळे निर्माण होतात, परिपूर्ण व्यक्ती नव्हे त्यामुळे सध्याची परीक्षा पद्धती मान्य नाही.
मॅगी होण्याची घाई !
च्फास्टफूडच्या जमान्यात प्रत्येकाला मॅगी होण्याची घाई असते, त्यामुळे कित्ता गिरवण्याची सवय हरवत चालल्याचे तावडेंनी सांगितले. कोणत्याही गोष्टीत ‘इन्स्ंटट’ परिणाम पाहिजे असल्याने कित्ता गिरवणे मागे पडल्याचे सांगितले. त्यामुळेच नाटकांचे थिएटर्सही बंद होत असल्याचे चित्र आहे. सध्याच्या पिढीला रियाज, तालीम कित्ता या गोष्टींचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.