टीआरपी घोटाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेला बार्कचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला. त्याच्या कोठडीची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्या. पी. डी. नाईक यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने पार्थो दासगुप्ता (वय ५५) याला दोन लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका व तेवढीच रक्कम भरणारे दोन हमीदार सादर करण्याचे निर्देश दिले. टीआरपी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दासगुप्ता असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या १५ आरोपींपैकी पार्थो हाच एकटा सध्या कारागृहात आहे.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार व परिस्थितीनुसार, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे आरोपीला कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही, असे न्या. नाईक यांनी जामीन मंजूर करताना म्हटले.
दासगुप्ताची जामिनावर सुटका करण्यात आली, तर तो तपासाला हानी पोहोचवणार नाही. त्यामुळे खटला संपेपर्यंत आरोपीला कारागृहात ठेवण्याची आवश्यकता नाही. आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करण्यात येत आहे. दोन लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका भरावा. तसेच तेवढीच रक्कम भरणारे दोन हमीदार सादर करावेत, असा आदेश न्यायालयाने दिला. तसेच न्यायालयाने दासगुप्ता याला पासपोर्ट संबंधित पोलीस ठाण्यात जमा करायला सांगितला. तसेच ट्रायल कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून न जाण्याचे आदेशही दिले. त्याचवेळी न्यायालयाने पार्थो याला सहा महिने दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देशही दिले. ट्रायल कोर्ट जेव्हा आदेश देईल तेव्हा न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने दासगुप्ताला दिले.