भाजपाचे माजी आमदार तोडसाम राष्ट्रवादीत; यवतमाळ जिल्ह्यात पक्षाला आणखी मिळणार बळकटी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 07:26 AM2021-11-12T07:26:08+5:302021-11-12T07:26:24+5:30
तोडसाम यांच्या पक्ष प्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी बळकटी मिळेल.
मुंबई : भाजपचे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित होत्या. ‘माझ्या मागे ईडी लागली तरी चिंता नाही,’ असे तोडसाम यावेळी म्हणाले.
तोडसाम यांच्या पक्ष प्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी बळकटी मिळेल. भाजपमध्ये जुन्या नेत्यांना डावलले जात आहे. त्यातूनच तोडसाम यांच्यासारखा नेता आज आपल्या पक्षात प्रवेश करीत आहे, असे जयंत पाटील म्हणाले. तोडसाम म्हणाले, २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी माझे तिकीट कापले.
मी राष्ट्रवादीत जाणार म्हटल्यानंतर त्यांनी भाजपमध्येच राहण्याचा सल्ला मला दिला. मात्र मी निर्णयावर ठाम राहिलो. मला ईडी मागे लागण्याची चिंता नाही. मी आदिवासी माणूस आहे. चौकशी केली तरी काही सापडणार नाही. यावेळी मंत्री नवाब मलिक, आ. इंद्रनील नाईक, बाळासाहेब कामारकर आदी उपस्थित होते.