भाजपाच्या माजी खासदाराच्या पुतण्याची मुंबईत आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:54 PM2024-10-15T23:54:58+5:302024-10-15T23:58:20+5:30

Mumbai Latest Crime News: भाजपाच्या माजी खासदाराच्या पुतण्याने मुंबईतील अंधेरी येथील राहत्या घरावरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणाचा शोध सुरू.

former bjp mp sangam lal gupta nephew sagar gupta committed suicide andheri area in mumbai | भाजपाच्या माजी खासदाराच्या पुतण्याची मुंबईत आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी

भाजपाच्या माजी खासदाराच्या पुतण्याची मुंबईत आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी

Sagar Gupta Suicide: मुंबईतील अंधेरी भागात भाजपाच्या माजी खासदाराच्या पुतण्याने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सागर गुप्ता असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याने अंधेरी पूर्वमधील हरिदर्शन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. 

सागर गुप्ता हा उत्तर प्रदेशातील प्रतापगड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार संगम लाल गुप्ता यांचा पुतण्या होता. सागर गुप्ता कांदिवलीतील ठाकूर महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. अंधेरी पूर्वमधील अंबुजवाडी भागात असलेल्या हरिदर्शन भवन इमारतीत तो कुटुंबासोबत राहत होता. 

घरी आला अन् सहाव्या मजल्यावरून मारली उडी

सागर गुप्ता दुपारी महाविद्यालयातून घरी आला. घरी आल्यानंतर तो घरातील कोणाशीही बोलला नाही. त्यानंतर त्याने सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली. सोसायटी परिसरात काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आल्याने लोक बाहेर आले आणि त्यांनी जाऊन बघितले. 

सागर गुप्ता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सागरला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. 

आत्महत्येचा कारणाचा पोलिसांनी सुरू केला तपास

सागर गुप्ताने आत्महत्या करण्यापूर्वी काही लिहून ठेवलंय का? यासाठी पोलिसांनी घराची झडती घेतली. पण, काहीही आढळून आले नाही. सागर गुप्ताने नेमकी आत्महत्या का केली, या कारणाचा शोध आता पोलिसांनी सुरू केला आहे. 

संगम लाल गुप्ता : २०१९ मध्ये खासदार, २०२४ मध्ये पराभव

संगम लाल गुप्ता २०१७ मध्ये पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. प्रतापगड जिल्ह्यातील सदर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अपना दल पक्षाकडून निवडणूक लढवली होती आणि जिंकले होते. त्यानंतर २०१९ मध्ये संगम लाल गुप्ता यांनी भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि ते खासदार बनले. त्यानंतर भाजपाने २०२४ मध्ये पुन्हा उमेदवारी दिली पण त्यांचा पराभव झाला.

Web Title: former bjp mp sangam lal gupta nephew sagar gupta committed suicide andheri area in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.