लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी संचालक रणजित सिन्हा यांचे कोरोनामुळे शुक्रवारी पहाटे दिल्लीत निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा आहे. गुरुवारी रात्री त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
सिन्हा बिहार कॅडरचे १९७४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ३ डिसेंबर २०१२ ते २ डिसेंबर २०१४ दरम्यान ते सीबीआयच्या संचालकपदी होते. सिन्हा हे सीबीआयचे २६ वे संचालक होते. यापूर्वी त्यांनी इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) चे महासंचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. तसेच सहसंचालक आणि डीआयजीपदासह सीबीआयमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. यापूर्वी त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाचेही नेतृत्व केले होते.
सिन्हा यांनी पाटणा विद्यापीठातून विज्ञान या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. नवी दिल्ली येथून फिलॉसॉफीमध्ये मास्टर केले. पुढे ऑस्ट्रेलियाच्या वोलोंगोंग विद्यापीठातून एचआर मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला. पोलीस सेवापदक आणि सन्माननीय सेवेसाठी १९९७ मध्ये त्यांना राष्ट्रपती पोलीसपदक मिळाले हाेते. दरम्यान, सिन्हा हे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वादातही अडकले होते. सीबीआयने त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हाही दाखल केला होता.
..............................