न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माजी सीईओला चौकशीअंती अटक; घोटाळ्यात हिस्सा मिळाल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 09:10 IST2025-02-22T09:09:00+5:302025-02-22T09:10:05+5:30
मुळचा दिल्लीचा रहिवासी असलेला अभिमन्यू हा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. २००७ -०८ पासून तो बँकेत कार्यरत होता.

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माजी सीईओला चौकशीअंती अटक; घोटाळ्यात हिस्सा मिळाल्याचा आरोप
मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १२२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अभिमन्यू भोअनला (४५) आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. भोअनला या घोटाळ्याची माहिती होती. तसेच बँकेतून काढण्यात येणाऱ्या पैशाप्रकरणी वेळोवेळी भोअनला हिस्सा मिळत असल्याचा संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे.
मुळचा दिल्लीचा रहिवासी असलेला अभिमन्यू हा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. २००७ -०८ पासून तो बँकेत कार्यरत होता. मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी रिझर्व बँकेची परवानगी न मिळाल्यामुळे त्याला ६ फेब्रुवारी, २०२४ मध्ये कार्यमुक्त करण्यात आले होते. भोअन सीईओ म्हणून कार्यरत असताना अटकेत असलेला महाव्यवस्थापक हितेश मेहता याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्याचावर होती.
बँकेने २० कोटी रुपयांचे रोख ठेवण्याचे ठरवले असतानाही या कालावधीत बँकेत १२२ कोटी रुपयांची रोकड का ठेवण्यात आली? ती रक्कम प्रभादेवी आणि गोरेगाव येथील तिजोरीत नसल्याची बाब त्यांच्या लक्षात कशी आली नाही? अशा अनेक गोष्टी संशयास्पद असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने त्याला चौकशीला बोलावले होते. त्यानंतर सलग दोन दिवस सुरू असलेल्या चौकशीअंती त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
तीन आरोपींना कोठडी
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी हितेश मेहता आणि पोलिसांनी अटक केलेल्या बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू भोअनला न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत ईओडब्ल्यू कोठडी सुनावली.
या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्लू) करत आहे. बँकेचा महाव्यवस्थापक व खातेप्रमुख हितेश मेहता याच्यावर बँकेच्या तिजोरीतून १२२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. मेहता याला रिअल इस्टेट डेव्हलपर धर्मेश पौनसह अटक करण्यात आली. मेहताने १२२ कोटी रुपयांपैकी रक्कम धर्मेशला दिल्याचा आरोप आहे.
मेहता, पौन आणि भोअन यांना शुक्रवारी दंडाधिकारी न्यायालयात पोलिसांनी हजर केले. मेहता, पौन आणि भोअन यांना समोरासमोर आणून चौकशी करायची आहे, असे पोलिसांनी या तिघांची ईओडब्ल्यू कोठडी मागताना दंडाधिकाऱ्यांना सांगितले.