Join us

'मुलगा कितीही पुढे गेला तरी बापाला वाटतं त्याला कमी समजतं'; फडणवीसांचा पवारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 10:49 AM

देवेंद्र फडणवीस आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

मुंबई: निसर्ग चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस कोकण दौऱ्यावर गेले होते.  यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील कोकणदौरा करणार असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीसांच्या या कोकण दौऱ्यावर शरद पवार यांनी  जोरदार टोला लगावला होता.

कोकणात किती नुकसान झालं आहे, हे सर्वांना कळलं पाहिजे. प्रत्येकजण वेगवेगळ्या भागतून येतो. मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत, तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल,असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी विदर्भामधला आहे, त्यामुळे समुद्राशी काहीही संबंध नाही असं शरद पवार म्हणाले आहे. पण मी अनेकदा बारामतीत गेलो, तिथे मला समुद्र दिसला नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला आहे.

शरद पवार माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यामुळे मुलगा कितीही पुढे गेला तरी बापाला असं वाटतं की त्याला कमी समजतं,म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच शरद पवरांना माझ्या खांद्यावरुन वांद्र्याचे सीनियर आणि बारामतीच्या ज्युनियर यांच्यावर बंदुक चालवायची आहे, असं म्हणत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यावेळी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य केलं आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते- 

रत्नागिरी जिल्ह्यातील गावांमध्ये वादळामुळं झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व अन्य नेत्यांनी नुकताच कोकणाच्या वादळग्रस्त भागांचा दौरा केला. त्यानंतर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही कोकणात जाणार असल्याचं सांगितलं जातं. देवेंद्र फडणवीस यांच्या कोकणदौऱ्यावर शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली. 'कोकणात किती नुकसान झालं आहे हे सर्वांना कळलं पाहिजे. प्रत्येक जण वेगळ्या भागांतून येतो. मी बारामतीच्या दुष्काळी भागातला आहे. ते नागपुरातले आहेत. समुद्राचा आणि नागपूरचा काही संबंध नाही. त्यामुळं सगळ्यांच्या ज्ञानात भर पडेल. आमच्याही पडते आहे. त्यांच्याही ज्ञानात भर पडेल ही चांगली गोष्ट आहे,' असं शरद पवार म्हणाले होते.

टॅग्स :शरद पवारदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेअजित पवारभाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकारनिसर्ग चक्रीवादळ