Join us

माजी मुख्यमंत्री आले म्हणून उठला आणि मार खाऊन पडला बाहेर

By मनीषा म्हात्रे | Published: February 08, 2018 6:33 AM

समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या भेटीसाठी एका वास्तुविशारदने वरिष्ठ नेत्याकडे फिल्डींग लावली. सभेदरम्यान प्रवेश मिळाला.

- मनीषा म्हात्रेमुंबई : समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या भेटीसाठी एका वास्तुविशारदने वरिष्ठ नेत्याकडे फिल्डींग लावली. सभेदरम्यान प्रवेश मिळाला. त्याने वडीलांसह व्हीआयपी कक्ष गाठला. सभेला सुरुवात झाली. आणि अचानक मुख्यमंत्री आलेरे.. या आवाजाने अनेकांप्रमाणे तोही उठला. मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी उठबस सुरु झाली. हीच उठबस तेथील स्वयंसेवकांना खटकली. आणि त्यांनी त्याच्यासह त्याच्या ५६ वर्षाच्या वडीलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आणि बाहेर काढल्याची घटना चुनाभट्टीमध्ये घडली.अंधेरी पश्चिमेकडील लिंकरोड परिसरात वास्तुविशारद तसेच बांधकाम व्यावसायिक शादाबअहमद रईस अन्सारी कुटुंबियांसोबत राहतात. वडील रईस अन्सारी (५६) यांचे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष, आमदार अबु आझामी यांच्यासोबत जुने संबंध आहे. अशात ४ फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली देश बचाव, देश बनाव अशा महारँलीचे आयोजन करून चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते. आझमी यांनी अन्सारी यांच्या वडीलांना येथील सभेचे आमंत्रण दिले. आणि यादव यांच्यासोबत भेट घालून देतो असे सांगितले.यादव यांच्या भेटीची अन्सारी यांना उत्सुकता लागली. ५ वाजता यादव मैदानात येणार होते. त्याच्या अर्धा तास आधीच अन्सारीने वडीलांसोबत तळ ठोकला. व्हीआयपी कक्षात जाऊन बसले. साडे पाचच्या सुमारास मंचावर मान्यवरांचे भाषण चालू असताना अचानक सी.एम.साहेब आले,सी.एम.साहेब आले असा आवाज आल्याने सर्व जमलेल्या लोकांप्रमाणेच अन्सारीही जागेवरून उठून प्रवेशद्वाराकडे पाहू लागले. परंतु सी.एम.साहेब आलेले नसल्याने पुन्हा सर्वजण आपआपल्या जागेवर बसु लागले. अन्सारी उभे राहिलेले पाहून दोन ते तीन स्वयंसेवकांनी त्यांना हटकले. त्यात अन्सारी यांच्या वडीलांनाही धक्काबुकी केली. त्यांच्या वडीलांनी त्यांना धक्का का मारता,आम्हाला अबु आझमी साहेबांनी स्वत: बोलावले आहे असे सांगितले.परंतु ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी धक्काबुक्की करत वडीलासह अन्सारीना लाथाबुक्क्यांसह मारहाण केली. त्या तिघांनी अन्सारींना व्ही.आय.पी.कक्षातून बाहेर काढून इधर से निकल जाओ वरना जानसे मार देगे असे म्हणून तेथून धक्का मारून बाहेर काढले.बाहेर आल्यानंतर वडीलांची हि-यांची अंगठी आणि पाकिट गायब झाल्याने त्यांना डोक्याला हात मारण्याची वेळ आली. त्यांनी वडीलांसह रुग्णालय गाठले. तेथे उपचार घेतल्यानंतर सोमवारी चुनाभट्टी पोलीस ठाणे गाठून वरील घटनेला वाचा फोडली. चुनाभट्टी पोलिसांनी अन्सारी यांच्या तक्रारीवरुन शाहनवाज व त्यांचे इतर दोन साथीदार यांचविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शंकर भोसले यांनी दिली.

टॅग्स :अखिलेश यादव