Join us

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे सुपुत्र नावीद अंतुले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 12:34 AM

बॅ. ए. आर अंतुले यांचे सुपुत्र नावीद अंतुले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले.

मुंबईः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे सुपुत्र नावीद अंतुले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. ए.आर. अंतुले यांचे सुपुत्र नावीद अंतुले यांचे मंगळवारी (28 एप्रिल) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.मंगळवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, वडील बॅ. ए. आर. अंतुले राजकारणात सक्रिय असताना नावीद अंतुले हे राजकारणापासून दूर होते. दोन वर्षांपूर्वी आंबेत ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते सक्रिय झाले. स्थानिक जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. बोलायला रोखठोक असलेले नावीद तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत मार्च 2019 मध्ये नावीद अंतुले यांनी काँग्रेसला रामराम करत थेट शिवसेनेत प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला होता.अनेक वर्षे राजकारणापासून दूर असलेल्या नावीद अंतुले यांनी मागील वर्षी अचानक राजकारणात प्रवेश करून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. ए. आर. अंतुले यांचे सुपुत्र असणाऱ्या नावीद अंतुले यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे रायगडच्या राजकीय अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र त्यांनी अचानक शिवसेनेच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णयामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात प्रचारफेरीत भाग घेत शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र त्यांची राजकीय कारकीर्द अल्पायुषी ठरली. बॅ. अंतुले यांचे गाव असलेल्या आंबेतमध्ये नावीद अंतुले यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या निधनाच्या या वृत्ताने आंबेतसह रायगडवासियांना मोठा धक्का बसला आहे.