मुंबई- महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यावरून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘शिवरायांचा अपमान पाहण्यापेक्षा मेलो असतो, तर बरं झालं असतं,’ अशी भावना व्यक्त करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांइतकेच त्यांच्या वक्तव्यावर शांत बसणारे दोषी असल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं.
उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात आज किल्ले रायगड येथे निर्धार शिवसन्मानाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधताना खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची घोषणा त्यांनी केली. या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
उदयनराजेंच्या या भूमिकेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं आहे. उदयनराजे यांना मी खास धन्यवाद देईल. या मुद्द्यावर भाजपामधील सुद्धा छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. तशी सुरुवात झाली आहे. आम्ही अवधी दिला होता. चांगलं सांगून राज्यपाल जात नसेल तर महाराष्ट्र काय आहे दाखवण्याची वेळ आली आहे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
दरम्यान, ज्या ज्या वेळेस महाराजांची अवहेलना केली जाते. त्या त्या वेळी राग कसा येत नाही. सर्वच पक्षाचा मूळ अजेंडा हा शिवरायांचे विचार आहेत. तसं नसेल तर शिवरायांचे नाव तरी का घेता. भावी पिढीसमोर काय इतिहास ठेवणार. चुकीचा इतिहास ठेवला तर येणाऱ्या पिढीला हाच खरा इतिहास वाटेल. राष्ट्रद्रोहाच्या कायद्यासोबतच महापुरुषांचा अपमान होणार नाही याबद्दलही कायदा करावा. इतिहासासोबत अशीच छेडछाड सुरू राहिली. तर भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असला तरी तुकडे होण्यास किती वेळ लागणार आहे, असं उदयनराजे काल पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
मी कुणाच्याही फोनची वाट पाहत नाही-
'मी कुणाच्याही फोनची वाट पाहत नाही, राज्यपालांनी केलेले वक्तव्य गंभीर आहे. माझ्याशी या संदर्भात कोणीही बोलले नाहीत, त्यांना जे योग्य वाटत ते करतात. मला जे योग्य वाटत ते मी करतो, असंही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"