...अन् भर जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी केली एकनाथ शिंदेंची नक्कल; त्या विधानाचा केला उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 09:48 AM2023-04-03T09:48:10+5:302023-04-03T09:50:58+5:30
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ जाहीर सभा झाली.
राज्यभर सध्या हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत; पण जगातील सर्वांत शक्तिशाली नेता पंतप्रधानपदी असताना हिंदूंना जनआक्रोश का करावा लगतोय, असा सवाल शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ जाहीर सभा झाली.
महाविकास आघाडीची 'वज्रमूठ'!
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 2, 2023
आज मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. या सभेसाठी पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे, विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह 'मविआ'चे प्रमुख नेते उपस्थित होते. pic.twitter.com/ix2D15h8ql
मविआच्या नेत्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टीकेचे लक्ष्य बनविले. सर्वांत आक्रमक भाषण उद्धव ठाकरे यांनी केले. ते म्हणाले, सध्या कोंबड्या झुंजविण्याचे उद्योग सुरू आहेत. निवडणुका आल्याने जातीय तेढ निर्माण केली जात आहे. हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जाताहेत, सावरकरांच्या नावे यात्रा काढली जातेय. सावरकरांबद्दल आम्हाला आदर आहेच; पण तुम्हाला खरेच प्रेम असेल तर सावरकरांना भारतरत्न देण्याची हिंमत दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
उद्धव ठाकरे यांनी सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल देखील केली. तुम्हाला विचार दुसऱ्यांचे लागतात, अगदी बोलताना सुद्धा 'वाचू का? वाचू का?' असं करतात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची नक्कल केली. तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमच्यासमोर ठेवलेलं कदाचित तुम्ही वाचाल, मात्र जनता जेव्हा मतदानाला उतरेल, तेव्हा तुम्ही वाचणार नाही, असा दावाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. कागदावर लिहलेलं अडखळत का होईना वाचू शकाल, पण जनतेशी खेळ करू नका, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
दरम्यान, न्यायमूर्तीच्या नेमणुकीवरून केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्ट वादाचा संदर्भ देऊन ठाकरे म्हणाले, न्यायव्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न होतोय; पण असाच प्रयत्न इस्रायलमध्ये झाला तर तिथली जनता रस्त्यावर उतरली. भारतातदेखील ते होईल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. आम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन हिंदुत्व सोडले, असा आरोप केला जातो. मग काश्मिरात मेहबुबा मुफ्ती, बिहारात नितीशकुमार, मेघालयात संगमा यांच्या सोबत जाऊन तुम्ही काय केले, असा सवाल ठाकरे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी मागितली म्हणून दंड आकारला जातो, यावरही त्यांनी टीका केली. हिंमत असेल तर मोदींना घेऊन तुम्ही महाराष्ट्रात या मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन तुम्हाला सामोरा येतो, असे आव्हानही ठाकरे यांनी भाजपला दिले.
ही कसली वज्रमूठ, ही तर वज्रझूठ सभा- मुख्यमंत्री शिंदेंची टीका
'ही कसली वज्रमूठ? वज्रमूठ चांगल्या लोकांची असते. ही तर 'वज्रझूठ' आहे. सभा घेण्याची परवानगी सर्वांना आहे, पण सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत ही सभा होत आहे. बाळासाहेबांनी संभाजीनगरची मागणी केली होती आणि आज तिथेच ही सभा होत आहे. बाळासाहेबांनाही हे पाहून दूःख होत असेल. सावरकरांनी देशासाठी समुद्रात उडी टाकली, हे सत्तेसाठी कोलांटउड्या मारतात. राज्यातील जनता सुज्ञ आहे, त्यांना चोख उत्तर देईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.